

Why did Jagdeep Dhankhar resign Explained In Marathi
नवी दिल्ली: उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी मंगळवारी संध्याकाळी तडकाफडकी राजीनामा दिल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली. राष्ट्रपतींना लिहिलेल्या पत्रात धनखड यांनी आरोग्याला प्राधान्य देण्यासाठी वैद्यकीय कारणास्तव राजीनामा देत असल्याचे म्हटले असले तरी या मागचं खरं कारण काही वेगळंच असल्याची चर्चा आहे.
धनखड यांच्यावर विरोधी पक्षांकडून सातत्याने सत्ताधाऱ्यांच्या बाजूने झुकत असल्याचा आरोप होत होता. ही प्रतिमा पुसून काढण्यासाठी त्यांनी काही पावले उचलण्यास सुरुवात केली होती. याच प्रयत्नांचा एक भाग म्हणून त्यांनी दिल्ली हायकोर्टाचे न्या. यशवंत शर्मा यांना हटवण्याच्या औपचारिक प्रक्रियेला सुरूवात केली होती. मार्च 2025 मध्ये वर्मा यांच्या दिल्लीतील निवासस्थानी आग लागली होती आणि त्यांच्या घरातून मोठ्या प्रमाण रोख रक्कम जप्त करण्यात आली होती. राज्यसभेच्या 63 खासदारांनी न्यायमूर्ती वर्मा यांना पदावरून हटवण्याची नोटीस दिली. ही नोटीस राज्यसभेचे सभापती धनकड यांच्याकडे देण्यात आली.
धनखड यांनी केवळ नोटीस स्वीकारली नाही, तर दोन्ही सभागृहांमध्ये अशाच प्रकारच्या नोटीस सादर झाल्यास न्यायमूर्ती वर्मा यांच्यावरील आरोपांची चौकशी करण्यासाठी एक संयुक्त समिती स्थापन केली जाईल, अशी माहितीही राज्यसभेला दिली.
याच मुद्द्यावरून धनखड आणि सरकार यांच्यात मतभेद झाल्याचे समजते. हा वाद इतका टोकाला पोहोचला की सोमवारी दुपारी फोनवरील संभाषणादरम्यान धनकड आणि एका वरिष्ठ नेत्यात शाब्दिक वाद झाला, असे वृत्त ‘द हिंदू’ने दिले आहे.
राज्यसभेच्या कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीला दोन मंत्र्यांची अनुपस्थिती
काँग्रेस नेते जयराम रमेश यांच्या दाव्यानुसार सोमवारी संध्याकाळी धनकड यांनी राज्यसभेच्या कामकाज सल्लागार समितीच्या बैठक बोलावली होती. चार वाजता होणाऱ्या या बैठकीत जे पी नड्डा आणि किरेन रिजीजू अनुपस्थित होते. विशेष म्हणजे दुपारी साडे बारा वाजता झालेल्या बैठकीत हे दोन्ही नेते उपस्थित होते.
न्यायपालिका आणि धनखड... सरकारची डोकेदुखी
धनखड यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींच्या कार्यपद्धतीवर आणि अधिकारांवर मत व्यक्त केले होते. त्यांची ही टिप्पणी न्यायव्यवस्था आणि सरकार यांच्यात तणाव निर्माण करणारी होती. या विधानामुळे सरकारची मोठी कोंडी झाली होती. इतक्या महत्त्वाच्या पदावर असलेली व्यक्ती अशी वादग्रस्त विधाने करत असेल, तर ते योग्य नाही, अशी भूमिका सत्ताधारी पक्षातील काही ज्येष्ठ नेत्यांनी घेतली होती.
न्या. वर्मा यांच्याबाबतचा निर्णय हा न्यायपालिकेचा अंतर्गत विषय असून धनखड यांनी नोटीस स्वीकारल्याने सरकार आणि न्यायपालिकेत वाद निर्माण झाला होता. सरकार सध्या हा वाद ओढावून घेण्यास तयार नव्हती.
कार्यकाळ संपण्यापूर्वी राजीनामा देणारे पहिले उपराष्ट्रपती आहेत का?
नाही. धनखड यांच्यापूर्वी व्ही. व्ही. गिरी (मे 1969) आणि रामस्वामी व्यंकटरामन (1987) यांनी देखील उपराष्ट्रपतीपदाचा राजीनामा दिला होता. धनखड हे कार्यकाळ संपण्यापूर्वी राजीनामा देणारे तिसरे उपराष्ट्रपती ठरले.
व्ही व्ही गिरी आणि व्यंकटरामन यांनी उपराष्ट्रपतीपदाचा राजीनामा का दिला होता?
राष्ट्रपतीपदाची निवडणूक लढवण्यासाठी गिरी यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता. या कारणामुळेच त्यांनी राजीनामा दिला होता. तर व्यंकटरामन यांनी 1987 मध्ये राष्ट्रपतीपदासाठी राजीनामा दिला होता. ग्यानी झेल सिंग यांच्यानंतर ते राष्ट्रपतीपदी विराजमान झाले होते. दोन्ही नेत्यांनी राष्ट्रपतीपदासाठी उपराष्ट्रपतीपदाचा राजीनामा दिला होता.
भैरोसिंग शेखावत यांनी राजीनामा का दिला होता?
2007 मध्ये राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत प्रतिभा पाटील यांच्याविरोधात भैरोसिंग शेखावत हे रिंगणात होते. मात्र, पराभव झाल्यानंतर त्यांनी उपराष्ट्रपतीपदाचा राजीनामा दिला होता.
जगदीप धनखड कोण आहेत?
जगदीप धनखड हे वकील असून राजस्थानमधील झुनझुनू येथून ते 1980 मध्ये पहिल्यांदा खासदार म्हणून निवडून आले. 2003 मध्ये त्यांनी भाजपात प्रवेश केला. भाजपच्या लीगल सेलचे ते प्रमुख होते. 2019 मध्ये त्यांची पश्चिम बंगालचे राज्यपाल म्हणून नियुक्ती केली. ऑगस्ट 2022 मध्ये ते भारताचे उपराष्ट्रपती झाले. 2027 मध्ये त्यांचा कार्यकाळ संपणार होता. मात्र, त्यापूर्वीच त्यांनी 21 जुलै 2025 रोजी राजीनामा दिला.
जगदीप धनगड यांची जन्मतारीख काय?
धनखड यांचा जन्म 18 मे 1951 रोजी राजस्थानमधील झुनझुनू जिल्ह्यातील किठाना गावात झाला.
जगदीप धनगड यांच्या पत्नीचे नाव काय?
जगदीप धनगड यांच्या पत्नीचे नाव डॉ. सुदेश धनगड असून त्या अर्थशास्त्राच्या अभ्यासक आहेत. त्यांच्या मुलीचे नाव कामना असून त्या विवाहित आहे.