

why do not railway tracks rust what material are they made of
पुढारी ऑनलाईन :
रेल्वेचे रुळ अनेकदा पाणी, पाऊस आणि ओलाव्याच्या संपर्कात असतात. तरीही त्यांना गंज लागत नाही किंवा ते लवकर खराब होत नाहीत. यामागचे नेमके कारण काय आहे, हे जाणून घेऊया.
भारतीय रेल्वेचे जाळे देशाच्या कानाकोपऱ्यात पसरलेले आहे. दररोज लाखो लोक रेल्वेने प्रवास करतात. स्वस्त भाडे आणि सोयीस्कर प्रवास यामुळे भारतात रेल्वे हा प्रवासाचा सर्वाधिक पसंतीचा पर्याय आहे. आपण ट्रेन पाहतो, पण कधी विचार केला आहे का की ट्रेन ज्या रुळांवरून धावते ते रुळ नेमके कोणत्या धातूपासून बनलेले असतात? आणि बऱ्याचवेळा पाण्याच्या संपर्कात असूनही त्यांना गंज का लागत नाही?
रेल्वेचे रुळ लोखंडाचे असतात का?
बहुतेक लोकांना वाटते की रेल्वेचे रुळ लोखंडाचे असतात. मात्र हे पूर्णपणे बरोबर नाही. रेल्वेचे रुळ साध्या लोखंडापासून बनवलेले नसतात.
रेल्वेचे रुळ कोणत्या धातूपासून बनतात?
रेल्वेचे रुळ मँगनीज स्टील (Manganese Steel) या विशेष प्रकारच्या स्टीलपासून तयार केले जातात. या स्टीलमध्ये सुमारे 12 टक्के मँगनीज आणि 0.8 टक्के कार्बन असतो. या विशेष मिश्रधातूमुळे रुळांच्या वरच्या पृष्ठभागावर आयरन ऑक्साइडचा (गंजाची) थर तयार होत नाही, त्यामुळे रुळांना गंज लागत नाही.
रुळ तयार करताना त्यांना विशेष उष्णता प्रक्रिया (Heat Treatment) आणि कठीण फिनिशिंग दिली जाते. त्यामुळे ते अधिक मजबूत, टिकाऊ आणि वजन सहन करण्यास सक्षम बनतात.
लोखंडाला गंज का लागतो?
साध्या लोखंडाला पाणी आणि हवा हे मोठे शत्रू आहेत. जेव्हा लोखंड हवेत असलेल्या ऑक्सिजनच्या संपर्कात येते, तेव्हा त्याची रासायनिक प्रतिक्रिया होते. यामुळे लोखंडाच्या पृष्ठभागावर तपकिरी रंगाची आयर्न ऑक्साइडचा थर तयार होते, ज्यालाच आपण गंज म्हणतो.
मात्र रेल्वेचे रुळ मँगनीज स्टीलचे बनलेले असल्यामुळे ही प्रक्रिया त्यांच्यावर परिणाम करत नाही आणि म्हणूनच रुळ वर्षानुवर्षे मजबूत राहतात.