अखिलेश यादव ‘केंद्रीय’ राजकारणात, युपी विरोधी पक्ष नेता कोण होणार?

समाजवादी पार्टी प्रमुख अखिलेश यादव. (संग्रहित छायाचित्र )
समाजवादी पार्टी प्रमुख अखिलेश यादव. (संग्रहित छायाचित्र )

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : नुकत्‍याच झालेल्‍या लोकसभा निवडणुकीत समाजवादी पार्टीने उत्तर प्रदेशमध्‍ये घवघवीत यश मिळऐले. राज्‍यातील ८० पैकी ३७ जागांवर विजय मिळवला आहे. या यशामुळे आता पक्ष प्रमुख अखिलेश यादव पूर्णवेळ केंद्रीय राजकारणात सहभागी होणार आहेत. त्‍यामुळे ते उत्तर प्रदेश विधानसभा विरोधी पक्ष नेते पद सोडणार असून, त्‍यांच्‍या जागी कोणाची वर्णी लागणार याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष वेधले आहे.

'ही' नावे आहेत आघाडीवर

सपाचे अध्यक्ष अखिलेश यादव आता केंद्रीय राजकारण करणार आहेत. त्यांच्या जागी विरोधी पक्षनेतेपद म्‍हणून सध्या तीन नावांवर गांभीर्याने विचार केला जात आहे. यामध्ये अखिलेश यादव यांचे काका शिवपाल सिंह यादव, राम अचल राजभर आणि इंद्रजीत सरोज यांचा नावांचा समावेश आहे. हे तिघेही समाजवादी पार्टीचे राष्ट्रीय सरचिटणीस आहेत.प्रबळ दावेदार अखिलेश यादव यांचे काका आणि जसवंतनगरचे आमदार शिवपाल आहेत.

जातीय समीकरणाचही 'सपा' विचार करणार, इंद्रजित सरोज यांच्‍या नावाची चर्चा

सहा वेळा आमदार असलेले शिवपाल २००९ ते २०१२ या काळात विरोधी पक्षनेतेही राहिले आहेत. 2027 च्या विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून सपाही जातीय समीकरणे तयार करण्याचा प्रयत्न करत आहे. अशा स्थितीत या पदासाठी अत्यंत मागासलेल्या आणि दलित नेत्याच्या नावाचाही पक्ष विचार करत आहे. दलित नेत्यांमध्ये पाचवेळा आमदार इंद्रजित सरोज हे प्रमुख दावेदार आहेत. कौशांबीच्या मांझनपूर मतदारसंघाचे आमदार इंद्रजीत हे बसपाच्या मायावती सरकारमध्ये समाजकल्याण मंत्री राहिले आहेत. यावेळी त्यांचे पुत्र पुष्पेंद्र सरोज हे कौशांबीमधून खासदार निवडून आले आहेत.

राम अचल राजभर यांचेही नाव चर्चेत

आंबेडकर नगरच्या अकबरपूर मतदारसंघाचे आमदार राम अचल राजभर यांच्‍याही नावाची चर्चा आहे. 2007 ते 2012 या काळात मायावती सरकारमध्ये सहा वेळा आमदार असलेले राजभर परिवहन मंत्री होते. मागासलेल्या जातींमध्ये त्यांचा चांगला प्रभाव असल्याचे मानले जाते. सपा अध्यक्ष लवकरच त्यांच्यापैकी एकाकडे विरोधी पक्षाच्या नेत्याची जबाबदारी सोपवू शकतात असे मानले जात आहे.

उत्तर प्रदेश विधान परिषदेतही सपाला मिळणार विरोधी पक्षनेतेपद

दोन वर्षांनंतर सपाला पुन्हा विधान परिषदेचे विरोधी पक्षनेतेपद मिळणार आहे. जुलै 2022 मध्ये, सपाकडे 10 टक्क्यांपेक्षा कमी सदस्य असल्यामुळे लालबिहारी यादव यांच्याकडून हे पद काढून घेण्यात आले. आता 100 जागांच्या विधान परिषदेत सपाचे पुन्हा 10 सदस्य आहेत, अशा स्थितीत पक्षाला विरोधी पक्षनेतेपद मिळणार आहे. येथे कोणाची वर्णी लागणार याकडेही समाजवादी पार्टीतील नेत्‍यांचे लक्ष वेधले आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news