'NASA'ची आणखी एक अंतराळ माोहिम! जाणून घ्या भारतासाठी का आहे खास?
पुढारी ऑनलाईन डेस्क : Shubhanshu Shukla ISS | भारतीय वंशाच्या अमेरिकन अंतराळवीर सुनीता विल्यम्स (Sunita Williams) यांची पृथ्वीवर सुरक्षित घरवापसी झाली. यानंतर अमेरिकन अवकाश संशोधन संस्था नासाने (NASA) आता आणखी एक अवकाश मोहीम हाती घेतली आहे. नासाच्या या चौथ्या खासगी अंतराळ मोहिमेसंदर्भात महत्त्वाची माहिती दिली आहे. या संदर्भातील पाेस्ट नासाने अधिकृत X सोशल मीडिया अकाऊंटवरून केली आहे.
एक्सिओम-4 (Axiom-4) लवकरच मोहीमेचे प्रक्षेपण
नासाने त्यांच्या संकेतस्थळावर दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, "एक्सिओम-4 (Axiom-4) मोहिम मे २०२५ पूर्वी फ्लोरिडा येथील नासाच्या केनेडी स्पेस सेंटरमधून स्पेसएक्स ड्रॅगन अंतराळयानातून आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकाकडे प्रक्षेपित करेल. ते अंतराळ प्रयोगशाळेत १४ दिवस थांबेल. या मोहिमेचे नेतृत्व नासाच्या माजी अंतराळवीर पेगी ऍनेट व्हिट्सन करणार आहेत. त्यांच्यासोबत हंगेरीचे टिबोर कापू , भारतातील इस्रोचे (भारतीय अंतराळ संशोधन संस्था) अंतराळवीर शुभांशू शुक्ला, पोलंडमधील ईएसए (युरोपियन अंतराळ संस्था) स्लावोस उझ्नान्स्की-विस्निव्स्की हे मिशन तज्ञ म्हणून या मोहिमेत असणार आहेत".
अंतराळवीर शुभांशू शुक्ला करणार भारताचे नेतृत्त्व
नासा आणि भारतीय अंतराळ संस्थेच्या संयुक्त प्रयत्नांचा भाग म्हणून हे अभियान पहिल्यांदाच इस्रो अंतराळवीर शुभांशू शुक्ला यांना अंतराळ स्थानकावर पाठत आहे. नासाच्या या खासगी मोहिमेत पोलंड आणि हंगेरीमधील अंतराळवीर देखील पहिल्यांदाच या मोहित सहभागी होत आहेत. या मोहिमेनंतर देखील नासा अंतराळात प्रवेश वाढवण्याची आपली वचनबद्धता कायम ठेवत असल्याचे दिसते. कारण नासा २०२६ आणि २०२७ साठी लक्ष्यित असलेल्या आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर दोन नवीन खाजगी अंतराळवीर मोहिमांसाठी प्रस्ताव मागवत आहे, असे देखील नासाने त्यांच्या अधिकृत संकेतस्थळावर दिलेल्या माहितीत म्हटले आहे.
शुभांशू शुक्ला कोण आहेत?
शुभांशु शुक्ला 39 वर्षांचे असून, उत्तर प्रदेशातील लखनौचे रहिवासी आहेत. शुभांशु शुक्ला हे भारतीय वायुसेनेत फायटर पायलट आहेत. 2006 मध्ये ते भारतीय वायुसेनेत कार्यरत झाले होते. त्यांना 2000 तासांचा उड्डाणाचा अनुभव आहे. भारतीय वायुसेनेत असणाऱ्या सुखोई-30 एमकेआय, मिग-21एस, मिग-29एस, जॅग्वार, हॉक्स डोर्नियर्स आणि एन-32 सारखी लढाऊ विमानं चालवण्याचा अनुभव शुक्लांच्या गाठीशी आहे. भारताच्या महत्त्वाकांक्षी गगनयान मोहिमेसाठी निवडलेल्या अंतराळवीरांमध्येही त्यांचा समावेश आहे. मे २०२५ मध्ये प्रक्षेपिक होणाऱ्या एक्सिओम-४ (Axiom-4) मोहिमेत ते स्पेसएक्स ड्रॅगन अंतराळयानातून पायलट म्हणून अंतराळात प्रवेश करणार आहेत.
ही मोहीम भारतासाठी का आहे खास ?
या मोहिमेत शुभांशू शुक्ला भारताचे प्रतिनिधित्व करत आहेत. यापूर्वी, राकेश शर्मा १९८४ मध्ये अंतराळात जाणारे पहिले भारतीय बनले होते. हे अभियान भारताची वाढती ताकद आणि अवकाश क्षेत्रातील जागतिक सहकार्याचे प्रतिबिंब आहे. हे अभियान नासा, अॅक्सिओम स्पेस आणि इस्रो यांच्यातील सहकार्य मजबूत करेल, भविष्यात अवकाश संशोधन आणि अंतराळ प्रवासासाठी नवीन मार्ग उघडेल. शुभांशू शुक्ला म्हणाले, "हा फक्त माझा प्रवास नाही तर १.४ अब्ज भारतीयांच्या आशा आणि स्वप्नांचा प्रवास आहे."
खाजगी मोहीमा 'NASA'च्या धोरणाचा भाग
एक्सिओम-४ (Axiom-4) ला खाजगी अंतराळवीर मोहिम असल्याचे म्हटले आहे. ही खासगी मोहीम नासाची पृथ्वीच्या खालच्या कक्षेत एक मजबूत आणि स्पर्धात्मक व्यावसायिक अर्थव्यवस्था सक्षम करण्याच्या धोरणाचा एक महत्त्वाचा घटक आहे. नासाने २०१९ मध्ये अवकाश खासगी व्यावसायिक संस्थांना त्यांच्या मोहिमांसाठी आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकाचा वापर करण्याची इतर अवकाश संस्था आणि कंपन्यांना संधी देण्यास सुरुवात केली.
यापूर्वी तीन (3) एक्सिओम (Axiom) मोहीमा
अंतराळ स्थानकावरील पहिली खाजगी अंतराळवीर मोहिम, एक्सिओम-१, एप्रिल २०२२ मध्ये कक्षेत १७ दिवसांच्या मोहिमेसाठी पाठवण्यात आले होते. दुसरे खाजगी अंतराळवीर मोहिम एक्सिओम-२, मे २०२३ मध्ये चार खाजगी अंतराळवीरांसह सुरू झाले ज्यांनी कक्षेत आठ दिवस घालवले. जानेवारी २०२४ मध्ये सुरू करण्यात आलेले सर्वात अलीकडील खाजगी अंतराळवीर मोहीम एक्सिओम-३ या पथकाने १८ दिवस अंतराळ स्थानकात डॉक केले. आता लवकरच म्हणजे मे, २०२५ मध्ये एक्सिओम-4 (Axiom-4) मोहिम प्रक्षेपित केली जाणार असून, नासा यासाठी सज्ज आहे.
खाजगी मोहिमा मार्गदर्शिका म्हणून काम करतील; NASA
भविष्यातील व्यावसायिक अंतराळ स्थानकांची मागणी दर्शविण्यासाठी खाजगी अंतराळवीर मोहिमा देखील मार्गदर्शिका म्हणून काम करतात. पृथ्वीच्या खालच्या कक्षेत सतत मानवी उपस्थिती राखण्यासाठी नासा वचनबद्ध आहे. अंतराळ स्थानकाचे कार्यकाळ संपत असताना, सूक्ष्म गुरुत्वाकर्षण संशोधनात आपले नेतृत्व कायम ठेवण्यासाठी आणि मानवतेच्या फायद्यासाठी पृथ्वीच्या खालच्या कक्षेत शाश्वत प्रवेश सुनिश्चित करण्यासाठी नासाने व्यावसायिक अंतराळ स्थानके असलेल्या एका नवीन मॉडेलकडे वाटचाल करण्याची योजना आखली आहे.

