Who is Raul John Aju : बाथरूममध्ये व्हिडिओ बनवणारा मुलगा ते थेट पुतिनसोबत सेल्फी! कोण आहे हा १६ वर्षांचा भारतीय 'AI किड'?

मॉस्कोमधील 'AI Journey 2026' परिषदेत राहुल जॉन अजूने वेधले जगाचे लक्ष; तंत्रज्ञान आणि शिक्षणाच्या भविष्यावर पुतिन यांच्याशी थेट चर्चा.
Who is Raul John Aju : बाथरूममध्ये व्हिडिओ बनवणारा मुलगा ते थेट पुतिनसोबत सेल्फी! कोण आहे हा १६ वर्षांचा भारतीय 'AI किड'?
Published on: 
Updated on: 

मॉस्को / नवी दिल्ली : "जेव्हा मी ९ वर्षांचा होतो, तेव्हा बाथरूममध्ये बसून साधे व्हिडिओ बनवायचो. एक दिवस थेट रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्यासोबत सेल्फी घेईन, असा विचार स्वप्नातही केला नव्हता!" या कॅप्शनसह शेअर झालेला एक फोटो सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. या फोटोत जगातील सर्वात शक्तिशाली नेत्यांपैकी एक असलेल्या पुतिन यांच्यासोबत एक १६ वर्षांचा भारतीय मुलगा मोठ्या आत्मविश्वासाने उभा आहे. हा तरुण दुसरा-तिसरा कोणी नसून भारताचा 'एआय किड' (AI Kid of India) म्हणून ओळखला जाणारा राहुल जॉन अजू आहे.

रशियाची राजधानी मॉस्को येथे पार पडलेल्या 'एआय जर्नी २०२६' (AI Journey 2026) या जागतिक परिषदेत ही ऐतिहासिक भेट घडली. या भेटीत राहुलने केवळ फोटोच काढला नाही, तर थेट पुतिन यांच्याशी तंत्रज्ञान आणि शिक्षणाच्या भविष्यावर सखोल संवादही साधला.

पुतिन यांना विचारला थेट प्रश्न या संवादादरम्यान राहुलने पुतिन यांना विचारले की, "आपण गणितासारखे कठीण विषय एआयच्या मदतीने व्हिडिओ गेम्सच्या माध्यमातून का शिकवू शकत नाही? मी स्वतः गणिताच्या परीक्षेच्या एक दिवस आधी व्हिडिओ गेममधूनच गणित शिकलो होतो. वर्गातील ४० मुलांकडे एक शिक्षक एकाच वेळी वैयक्तिक लक्ष देऊ शकत नाही, पण एआय प्रत्येक विद्यार्थ्याला 'पर्सनलाइज्ड' अनुभव देऊ शकतो."

राहुलच्या या प्रश्नावर पुतिन यांनीही अत्यंत अभ्यासपूर्ण उत्तर दिले. पुतिन म्हणाले, "तुमचे म्हणणे बरोबर आहे, पण कोणतीही गोष्ट लक्षात कशी ठेवायची याची कलाही विद्यार्थ्यांना अवगत असायला हवी. एआयचा वापर मदतनीस म्हणून व्हायला हवा. केवळ एआयवर अवलंबून राहिल्यास मुले विचार करणेच बंद करतील, जे शिक्षण प्रक्रियेसाठी धोकादायक ठरू शकते." यावर राहुलने तात्काळ सहमती दर्शवत, आपण एआयवर पूर्णपणे अवलंबून न राहता त्याच्यासोबत 'कोलॅबोरेट' (मिळून काम) करायला हवे, असे मत मांडले.

बाथरूममधील व्हिडिओ ते स्वतःची एआय कंपनी वयाच्या अवघ्या १६ व्या वर्षी जागतिक नेत्यांशी संवाद साधणाऱ्या राहुलचा हा प्रवास थक्क करणारा आहे. राहुलच्या प्रवासाची सुरुवात व्हिडिओ एडिटिंगपासून झाली. त्याचे वडील 'अ‍ॅडोब' (Adobe) कंपनीत कार्यरत असल्याने राहुलला लहानपणीच प्रोफेशनल एडिटिंग सॉफ्टवेअर्स हाताळण्याची संधी मिळाली. तासन्तास बसून व्हिडिओ एडिट करण्याच्या छंदाचे रूपांतर पुढे तंत्रज्ञानाच्या वेडात झाले.

वयाच्या १२ व्या वर्षी त्याने शाळेच्या विज्ञान प्रदर्शनासाठी 'मीबॉट' (MeBot) नावाचा रोबोट तयार केला. त्यानंतर त्याने मागे वळून पाहिले नाही. आतापर्यंत त्याने १० हून अधिक एआय-आधारित टूल्स विकसित केले आहेत. २०२४ मध्ये त्याने 'एआय रेल्म टेक्नॉलॉजीस' (AI Realm Technologies) या स्वतःच्या स्टार्टअपची स्थापना केली. आज या कंपनीचा तो संस्थापक आणि सीटीओ (CTO) असून त्याच्या हाताखाली सुमारे १५ जणांची टीम काम करते.

वडिलांकडे सोपवली मॅनेजमेंटची धुरा केवळ तांत्रिक ज्ञान असून चालत नाही, तर कंपनी चालवण्यासाठी व्यवसायाची समजही आवश्यक असते, हे राहुलने वेळीच ओळखले. यासाठी त्याने आपल्या वडिलांना कंपनीच्या व्यवस्थापनाची (Management) जबाबदारी दिली. राहुलच्या वडिलांना अ‍ॅमेझॉन (Amazon), अ‍ॅडोब (Adobe), विप्रो (Wipro) आणि आयबीएम (IBM) यांसारख्या दिग्गज कंपन्यांमध्ये काम करण्याचा प्रदीर्घ अनुभव आहे.

५ लाख लोकांना एआयचे धडे आणि 'प्रोजेक्ट 47x' राहुल 'थिंक क्राफ्ट अकॅडमी' (Think Craft Academy) नावाचे लर्निंग प्लॅटफॉर्मही चालवतो. या माध्यमातून त्याने आतापर्यंत विद्यार्थी आणि नोकरदार अशा सुमारे ५ लाख लोकांना सोप्या भाषेत एआयचे प्रशिक्षण दिले आहे. याशिवाय सामान्य नागरिकांना कायद्याची क्लिष्ट माहिती सोप्या भाषेत समजावून सांगण्यासाठी त्याने 'प्रोजेक्ट 47x' हा एआय लीगल टेक्नॉलॉजी प्रकल्पही सुरू केला आहे. २०२६ च्या सुरुवातीला नवी दिल्लीत झालेल्या 'इंडिया एआय इम्पॅक्ट समिट'मध्येही त्याने सहभाग घेतला होता.

पुतिन यांच्याकडून 'मेक इन इंडिया'चे कौतुक या परिषदेत पुतिन यांनी राहुलच्या कामाचे तोंडभरून कौतुक केले. राहुलचे हे कार्य पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 'मेक इन इंडिया' अभियानाला पुढे नेण्यासाठी मोठी मदत करत असल्याचे पुतिन यांनी नमूद केले. रशियन दूतावासानेही राहुलचा गौरव करताना, रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन आणि कझाकिस्तानचे राष्ट्राध्यक्ष कासिम-जोमार्ट टोकायेव यांची भेट घेणाऱ्या निवडक युवा एआय प्रतिभावंत तरुणांमध्ये राहुलचा समावेश असल्याचे स्पष्ट केले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.