NCERT Partition Modules
नवी दिल्ली : नॅशनल कौन्सिल ऑफ एज्युकेशनल रिसर्च अॅण्ड ट्रेनिंग (NCERT) ने भारताच्या फाळणीवर आधारित दोन विशेष अध्ययन मॉड्यूल्स जारी केली आहेत. हे मॉड्यूल्स इयत्ता 6 वी ते 8 वी आणि 9 वी ते 12 वी या वर्गांतील विद्यार्थ्यांसाठी तयार करण्यात आले आहेत. या विशेष साहित्यामध्ये फाळणीसाठी थेट मोहम्मद अली जिन्ना, काँग्रेस पक्ष आणि लॉर्ड माउंटबॅटन यांना जबाबदार धरले गेले आहे.
हे दोन्ही मॉड्यूल्स नियमित अभ्यासक्रमाचा भाग नसून, पूरक शैक्षणिक साधने म्हणून वापरली जाणार आहेत. पोस्टर्स, वादविवाद, चर्चासत्रे आणि प्रकल्पांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना हे विषय शिकवले जातील.
या विशेष मॉड्यूल्समध्ये 'गिल्टी ऑफ पार्टिशन' (फाळणीचे दोषी) या शीर्षकाखाली स्पष्टपणे सांगितले आहे की – मोहम्मद अली जिन्ना यांनी फाळणीची मागणी लावून धरली, काँग्रेस पक्ष फाळणीस तयार झाला, तर लॉर्ड माउंटबॅटन यांनी तिची अंमलबजावणी केली.
यात भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांचे एक ऐतिहासिक विधानही समाविष्ट आहे. नेहरू म्हणाले होते की, “आम्ही अशा एका स्थितीला पोहोचलो आहोत, जिथे फाळणी स्वीकारणे किंवा अनंतकाळपर्यंत संघर्ष व अराजक यापैकी एक गोष्ट निवडावी लागेल.”
या मॉड्यूल्समध्ये फाळणीमुळे 1947 ते 1950 या कालखंडात भारताच्या एकात्मतेला झालेल्या तडजोडीवर सविस्तर चर्चा करण्यात आली आहे. फाळणीमुळे सीमेवरून शत्रुत्व निर्माण झाले. सामूहिक हत्याकांड, स्थलांतर आणि धार्मिक द्वेषाची बीजे रोवली गेली.
पंजाब आणि बंगालमधील अर्थव्यवस्था पूर्णतः कोलमडली. जम्मू आणि काश्मीरमधील सामाजिक व आर्थिक साखळी तुटली आणि त्याचेच पर्यवसान पुढे दहशतवाद, हिंसाचारात झाले, असे या मॉड्यूलमध्ये नमूद करण्यात आले आहे.
या विशेष मॉड्यूलच्या प्रस्तावनेत पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या Partition Horrors Remembrance Day वरील विधानाचा समावेश करण्यात आला आहे. मोदी म्हणाले होते की, “फाळणीची वेदना विसरणे शक्य नाही. लाखो नागरिक बेघर झाले, अनंत जीवांचे बळी गेले. त्या संघर्षांच्या आणि बलिदानांच्या स्मरणार्थ आपण 14 ऑगस्ट हा 'फाळणी वेदना स्मृती दिन' म्हणून पाळतो.”
एनसीईआरटीने स्पष्ट केले आहे की ही सामग्री शालेय अभ्यासक्रमात समाविष्ट नसून, विद्यार्थ्यांना इतिहासातील घटना समजावून सांगण्यासाठी तयार करण्यात आलेली पूरक माहिती आहे. या मॉड्यूल्सद्वारे विद्यार्थ्यांना इतिहासाचे वास्तव समजावे, आणि त्यातून सामाजिक शहाणपण विकसित व्हावे, हा यामागचा उद्देश आहे.
या नव्या उपक्रमावर प्रतिक्रिया देताना एनसीईआरटीच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, “इतिहासातील घटनांना नाकारता येत नाही. मात्र, आजच्या काळात कोणावर दोष टाकणे हे योग्य ठरणार नाही. उलट, भूतकाळातील चुकांचे मूळ समजून घेऊन, भविष्यात अशा चुका पुन्हा घडू नयेत, यासाठी विद्यार्थ्यांमध्ये इतिहासाबद्दल जागरूकता निर्माण करणे अधिक महत्त्वाचे आहे.”
संपूर्ण इतिहासाच्या नव्या आकलनाचा भाग म्हणून, गेल्या महिन्यातच एनसीईआरटी इयत्ता 8 वीच्या सामाजिक शास्त्राच्या पुस्तकात मुघल कालखंडाचा पुनरावलोकन करण्यात आला आहे.
यामध्ये मुघल शासकांच्या धार्मिक धोरणांचा, सांस्कृतिक योगदानाचा, तसेच मंदिरविध्वंस, दडपशाही व अल्पसंख्याक समुदायांवरील अत्याचारांचा उल्लेख करण्यात आला आहे.
विशेषतः, काशी (वाराणसी), मथुरा आणि सोमनाथ येथील मंदिरे, तसेच जैन, शीख, पारशी आणि सूफी समाजांवरील अन्यायाचेही उदाहरणे नमूद करण्यात आली आहेत.