

Who is Brazilian Model: काँग्रेसचे खासदार आणि विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी आज ‘H फाइल्स’ नावाच्या प्रेझेंटेशनद्वारे हरियाणातील निवडणुकीत झालेल्या कथित मतदार फसवणुकीचे पुरावे सादर केले. या सादरीकरणात त्यांनी दावा केला की हरियाणात एका ब्राझिलियन मॉडेलच्या फोटोचा वापर करून एका युवतीने 22 वेळा मतदान केलं.
राहुल गांधींनी ज्या फोटोचा दाखला देत “ब्राझिलियन मॉडेल” म्हटलं, ती व्यक्ती प्रत्यक्षात मॉडेल नसून एका फोटोग्राफरच्या कामाचा भाग आहे. त्या फोटोचा मालक Matheus Ferrero नावाचा ब्राझिलचा एक फोटोग्राफर आहे. त्यानेच हा फोटो काढला आहे, आणि तो फोटो Unsplash आणि Pexels सारख्या रॉयल्टी-फ्री वेबसाइट्सवर अपलोड करण्यात आला आहे.
म्हणजेच हा फोटो सार्वजनिक वापरासाठी खुला आहे, कोणतीही व्यक्ती हा फोटो वापरू शकते.
हा फोटो सध्या अनेक ई-कॉमर्स साइट्स, यूट्यूब थंबनेल्स आणि जाहिरातींमध्ये वापरला जात आहे. म्हणूनच, तो “ब्राझिलियन मॉडेल”चा असल्याचा दावा चुकीचा आहे. फोटोमध्ये दिसणारी महिला खरी असली, तरी तिचं नाव Matheus Ferrero नाही, कारण हे नाव त्या फोटो काढणाऱ्या फोटोग्राफरचं आहे.
काँग्रेसच्या अधिकृत X (माजी ट्विटर) अकाउंटवरून एका पोस्टमध्ये लिहिलं होतं “ब्राझिलची नागरिक मैथ्यूज फेरोरो हिने हरियाणात स्वीटी, सरस्वती, सीमा अशा 22 नावांनी मतदान केलं आहे.” या पोस्टनंतर काँग्रेसने दावा केला की, हीच ती मॉडेल आहे जिच्या नावाने बनावट मतं टाकली गेली.
राहुल गांधींनी पत्रकार परिषदेत ‘H फाइल्स’ सादर करताना वोट चोरीच्या गंभीर आरोपांची पुनरावृत्ती केली. त्यांनी सांगितले की हरियाणाच नव्हे, तर मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि महाराष्ट्रातही मतदान प्रक्रियेत घोळ झाला आहे.
राहुल गांधी म्हणाले “निवडणूक आयोगाकडे डुप्लिकेट मतदार काढण्यासाठी सॉफ्टवेअर आहे, पण ते चालवलं जात नाही. कारण, आयोग सत्ताधारी पक्षाला मदत करत आहे. हे स्पष्ट पुरावे आहेत की भाजप निवडणुकीत काय करत आहे.”