

नवी दिल्ली : पुढारी वृत्तसेवा-
शिवसेनेसह राष्ट्रवादी काँग्रेस आमदार अपात्रता प्रकरणाची सुनावणी आता गुरुवारी (२६ सप्टेंबर) सर्वोच्च न्यायालयात होण्याची शक्यती आहे. या आठवड्यात मंगळवारी, बुधवारी सलग दोन दिवस आणि त्यापुर्वीच्या दोन आठवड्यांमध्ये पाच दिवस हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयाच्या पटलावर होते. मात्र अन्य प्रकरणांमुळे आमदार अपात्रता प्रकरण सुनावणीपर्यंत पोहोचू शकले नव्हते. त्यामुळे यावेळी तरी या प्रकरणावर सुनावणी होणार का, याकडे सर्वांचे लक्ष असणार आहे.
शिवसेनेसह राष्ट्रवादी काँग्रेस आमदार अपात्रता प्रकरणाच्या सुनावणीसाठी गुरूवारी (उद्या) तारीख आहे. मात्र गुरूवारी सुनावणी न झाल्यास हे प्रकरण पुढच्या आठवड्यात जाईल. पुढच्या आठवड्यात २ऑक्टोबरला न्यायालयाला सुट्टी आहे. त्यानंतर ५ ते १२ ऑक्टोबर दसऱ्यानिमित्त सुट्टी आहे. त्यामुळे गुरूवारी किंवा पुढच्या आठवड्यात पहिला दोन दिवसात सुनावणी झाली नाही तर ही सुनावणी लांबण्याची शक्यता आहे. पुढे दिवाळीनिमित्त २६ ऑक्टोबर ते ३ नोव्हेंबर पर्यंत सुट्टी आहे. त्यानंतर १० नोव्हेंबरला सरन्यायाधीश निवृत्त होत आहेत.