नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : शिवसेनेसह राष्ट्रवादी काँग्रेस आमदार अपात्रता प्रकरणाची सुनावणी आज सर्वोच्च न्यायालयात पार पडणार होती. मात्र आणखी एक प्रकरण न्यायालयासमोर असल्याने यावर सुनावणी होऊ शकली नाही. दरम्यान ही दोन्ही प्रकरणे सर्वोच्च न्यायालयासमोर नमूद करण्यात आली. यामध्ये सर्वोच्च न्यायालयाने अजित पवार गटाला उत्तर सादर करण्यास तीन आठवड्यांचा वेळ दिला आहे. त्यामुळे ऑगस्ट महिन्याच्या शेवटी किंवा सप्टेंबर महिन्याच्या सुरुवातीला या दोन्ही प्रकरणांवर सुनावणी होण्याची शक्यता आहे.
दरम्यान राष्ट्रवादीसह शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणात या दोन्ही आमदार अपात्रता प्रकरणांची सुनावणी एकाच वेळी घ्यायची, असे सर्वोच्च न्यायालयाने ठरवले होते. त्यानुसार दोन्ही प्रकरणांच्या सुनावणीसाठी ६ ऑगस्ट ही तारीखही देण्यात आली होती. कारण दोन्ही प्रकरणे जवळपास सारखीच आहेत. असे असले तरी दोन्ही प्रकरणांची सुनावणी स्वतंत्रपणे होणार आहे.
सर्वोच्च न्यायालयाच्या आजच्या कामकारानंतर न्यायालयाच्या वेळापत्रकात शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणाच्या सुनावणीसाठी २१ ऑगस्ट ही तारीख दर्शवण्यात आली आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेस आमदार अपात्रता प्रकरणात ३ सप्टेंबर ही तारीख दर्शविण्यात आली आहे. या दोन्ही तारखा संभाव्य तारखा असून पुन्हा एकदा सुनावणीसाठी ही दोन्ही प्रकरणे एकाच दिवशी येण्याची शक्यता आहे. यापूर्वीही वेळापत्रकात दोन पक्षांच्या आमदार अपात्रता प्रकरणासाठी वेगवेगळ्या तारखा दर्शवण्यात आल्या होत्या. मात्र, शेवटी न्यायालयाने सांगितल्याप्रमाणे एकाच दिवशी हे दोन्ही प्रकरणे सुनावणीसाठी आली होती.