

पुढारी ऑनलाईन डेस्क : सरसंघचालक मोहन भागवत यांनी आज (दि.१६) पश्चिम बंगालमधील वर्धमान येथे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या (आरएसएस) परिषदेला संबोधित केले. यावेळी त्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या भूमिकेबाबत महत्त्वपूर्ण टिप्पणी केली.
पश्चिम बंगालमधील वर्धमान येथे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्वयंसेवकांच्या परिषदेला पाेलिसांनी परवानगी नाकारली हाेती. कोलकाता उच्च न्यायालयाच्या मंजुरीनंतर ही जाहीर सभा आयोजित करण्यात आली हाेती.
यावेळी सरसंघचालक भागवत म्हणाले की, "जगातील विविधता स्वीकारून, विविधतेत एकता आहे हे समजून घेऊन हिंदू धर्म प्रगती करतोय. देशभरात आर्थिक मोबदल्याशिवाय १ लाख ३० हजारांहून अधिक संघ स्वयंसेवकांचे निःस्वार्थ कार्य भारताच्या प्रगतीत योगदान देत आहे". म्हणूनच आम्ही म्हणत आहोत की, आम्ही यशस्वी होण्यासाठी हे करत नाही. आम्ही हे भारताच्या प्रगतीत अर्थपूर्ण योगदान देण्यासाठी करत आहोत. संघाने फक्त मूल्ये, विचार आणि प्रेरणा दिली आहे. एका शब्दात सांगायचे झाले तर राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हिंदू समाजाचे संघटन करण्याचे उद्दिष्ट ठेवते कारण हाच राष्ट्राचा जबाबदार गाभा आहे."
पश्चिम बंगालमधील पूर्बा बर्धमान येथील सभेत बोलताना आरएसएस प्रमुख मोहन भागवत म्हणाले की, "राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (RSS) देशातील समाजाला एकत्र करू इच्छितो. हिंदू समाजाला एकत्र का करायचे? कारण या देशासाठी जबाबदार असलेला समाज हा हिंदू समाज आहे. भारताचा एक स्वभाव आहे आणि ज्यांना वाटले की ते त्या स्वभावासोबत राहू शकत नाहीत, त्यांनी स्वतःचा वेगळा देश बनवला. हिंदू जगाच्या विविधतेचा स्वीकार करून पुढे जात आहेत."