

इंडोनेशियातील भारतीय संरक्षण प्रतिनिधी, कॅप्टन शिव कुमार यांनी ‘ऑपरेशन सिंदूर’बाबत केलेल्या एका वक्तव्यामुळे मोठा वाद निर्माण झाला आहे. काँग्रेसने केंद्र सरकारवर देशवासीयांची दिशाभूल केल्याचा आरोप केला आहे. या प्रकरणी वाद वाढत असल्याचे पाहून इंडोनेशियातील भारतीय दूतावासाने कॅप्टन शिव कुमार यांच्या वक्तव्याचा विपर्यास केला जात असल्याचा दावा केला आहे.
रविवार, १० जून रोजी इंडोनेशियातील एका विद्यापीठात आयोजित परिसंवादात भारतीय नौदल अधिकारी कॅप्टन शिवकुमार यांनी भारत-पाकिस्तान युद्धादरम्यान हवाई दलाच्या भूमिकेवर भाष्य केले. ते म्हणाले की, "पाकिस्तानी लष्करी तळांवर हल्ला न करता केवळ दहशतवादी तळांना लक्ष्य करण्याचे आदेश होते. ‘राजकीय नेतृत्वाने’ दिलेल्या आदेशांमुळे काही ‘मर्यादा’ आल्या. त्यामुळे भारतीय हवाई दल सुरुवातीच्या टप्प्यात पाकिस्तानी लष्करी तळांवर हल्ला करू शकले नाही. आम्ही काही विमाने गमावली. हे केवळ राजकीय नेतृत्वाने लष्करी तळ किंवा त्यांच्या हवाई संरक्षण प्रणालीवर हल्ला न करण्याच्या बंधनामुळे घडले. या नुकसानीनंतर आम्ही आमची रणनीती बदलली आणि लष्करी तळांवर हल्ले केले. त्यामुळे, आम्ही प्रथम शत्रूची हवाई संरक्षण प्रणाली नष्ट करण्यात यश मिळवले. म्हणूनच पृष्ठभागावरून हवेत आणि पृष्ठभागावरून पृष्ठभागावर मारा करणाऱ्या क्षेपणास्त्रांचा वापर करून आमचे सर्व हल्ले सहजपणे यशस्वी झाले."
इंडोनेशियातील भारतीय दूतावासाने रविवारी ‘एक्स’ या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर एक पोस्ट शेअर करत आपली भूमिका स्पष्ट केली. कॅप्टन शिव कुमार यांच्या वक्तव्याचा विपर्यास केला जात आहे. कॅप्टन शिवकुमार हे केवळ या वस्तुस्थितीवर भर देत होते की, भारतीय लष्कर हे शेजारील काही देशांप्रमाणे नसून, देशाच्या राजकीय नेतृत्त्वाच्या अधीन राहून कार्य करते, असे भारतीय दूतावासाने म्हटलं आहे.
दरम्यान, कॅप्टन शिवकुमार यांच्या वक्तव्याचा हवाला देत काँग्रेसने रविवारी (दि. २९) केंद्र सरकारवर हल्लाबोल केला. ‘ऑपरेशन सिंदूर’ दरम्यान भारतीय हवाई दलाला पाकिस्तानच्या हातून आपली लढाऊ विमाने गमवावी लागली होती, असे काँग्रेसने म्हटले. या प्रकरणी सरकारने देशाची ‘‘दिशाभूल’’ केली असल्याचा आरोपही काँग्रेसने केला आहे.