

Mt Everest News : भारतीय गिर्यारोहक सुब्रत घोष (वय ४५) यांनी ८,८४९ मीटर उंचीचे एव्हरेस्ट शिखर यशस्वीरित्या सर केले. मात्र हिलरी स्टेपवरून खाली परतताना त्यांचा मृत्यू झाला. जगातील सर्वात उंच शिखरावर अलिकडच्या काळात हा दुसरा मृत्यू असल्याची पुष्टी अधिकाऱ्यांनी केली आहे.
'द हिमालयन टाईम्स' दिलेल्या वृत्तानुसार, पश्चिम बंगालमधील नदिया जिल्ह्यातील राणाघाट येथील शिक्षक सुब्रता घोष हे अत्यंत कुशल गिर्यारोहक होते. याआधी त्यांनी अनेक मोहिमा यशस्वीपणे पूर्ण केल्या होत्या. कृष्णनगर - स्नोई एव्हरेस्ट एक्सपिडिशन २०२५ च्या माउंटेनियरिंग असोसिएशनच्या माध्यमातून त्यांनी एव्हरेस्ट मोहिमेत सहभाग घेतला होता.
सुब्रत घोष यांनी एव्हरेस्ट शिखर सर केला; परंतु उतरताना त्यांना थकवा जाणवू लागला. आजाराची लक्षणे दिसू लागली. यावेळी शेर्पा मार्गदर्शक चंपाल तमांग याने त्याला खाली उतरण्यासाठी राजी करण्याचा प्रयत्न केला, पण तो अयशस्वी झाला. सुब्रत यांनी खाली उतरण्यास नकार देत तेथेच थांबवण्याचा हट्ट धरला. गुरुवारी (दि. १५ मे) रात्री उशिरा चंपाल तमांग हे एकटेच कॅम्पमध्ये परतले. सुमारे १७ तासांपासून बेपत्ता असलेल्या घोष यांचा मृतदेह शुक्रवारी (दि.१६) सकाळी हिलरी स्टेपवर आढळला, अशी माहिती स्नोई होरायझन ट्रेक्स या मोहिमेचे आयोजन करणाऱ्या संस्थेचे व्यवस्थापकीय संचालक बोधराज भंडारी यांनी शुक्रवारी दिली. घोष यांचे पार्थिव अजूनही शिखरावर आहे आणि ते बेस कॅम्पवर आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत. शिखरावरुन परतण्यास त्यांनी नकार दिला, असे तामांग यांच्या हवाल्याने भंडारी यांनी सांगितले. घोष यांचा मृतदेह तळावर आणण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. मृत्यूचे कारण शवविच्छेदनानंतर स्पष्ट हाेणार आहे.
घोष यांच्या बहिणीचाही या मोहिमेत सहभाग होता, पण प्रतिकूल हवामानामुळे त्या बेस कॅंपमध्येच थांबल्या आणि शिखर चढाईस गेल्या नाहीत. सुब्रतघोष हे बागदा कापसाटी मिलनबिथी हायस्कूलमध्ये शिक्षक म्हणून कार्यरत होते आणि राणाघाट वेस्ट लायन्स क्लबचे सदस्य होते. त्यांचे नातेवाईक प्रताप साहा यांनी सांगितले, “ सुब्रत यांनी लहानपणापासूनच गिर्यारोहणाची आवड होती. त्यांनी योग्य प्रशिक्षण घेतले होते आणि पूर्वीही अनेक शिखरे सर केली होती. ते हे अत्यंत कुशल गिर्यारोहक होते.याआधी त्यांनी अनेक मोहिमा यशस्वीपणे पूर्ण केल्या होत्या."
हिलरी स्टेप 'डेथ झोन' मध्ये स्थित आहे. ८,००० मीटरपेक्षा जास्त उंचीचा हा भाग आहे. येथे ऑक्सिजनची पातळी असते. हा भाग गिर्यारोहकांसाठी अत्यंत धोकादायक मानला जातो, विशेषतः शिखरावर शेवटच्या चढाईदरम्यान आणि परतीच्या प्रवासादरम्यान मोठी जोखीम असते. मागील आठवड्यात फिलिपिनो नागरिक फिलिप सॅंटियागो यांचेही साउथ कर्नल येथे निधन झाले. रिपोर्टनुसार, १४ मे रोजी कॅम्प IV ला पोहोचल्यावर सॅंटियागो खूप थकले होते. तंबूत विश्रांती घेत असताना त्यांचा मृत्यू झाला. विशेष म्हणजे घोष आणि सॅंटियागो दोघेही स्नोई होरायझन ट्रेक्सने आयोजित केलेल्या आंतरराष्ट्रीय मोहिमांचा भाग होते. यंदा नेपाळच्या पर्यटन विभागाने माउंट एव्हरेस्ट चढाईसाठी ४५९ जणांना परवानगी दिली आहे. आतापर्यंत १०० हून अधिक गिर्यारोहक आणि मार्गदर्शक शिखरावर पोहोचले आहेत. या आठवड्यातच ५० हून अधिक गिर्यारोहकांनी हे शिखर यशस्वीरित्या चढले आहे.