

वॉशिंग्टन : जगातील सर्वात उंच पर्वतशिखर म्हणून हिमालयातील एव्हरेस्टची जगभर ख्याती आहे. आता या पर्वतशिखराचे एक छायाचित्र ‘नासा’ने प्रसिद्ध केले आहे. अंतराळातून टिपलेल्या या छायाचित्रात एव्हरेस्ट आणि त्याच्या ग्लेशियरना दर्शवले आहे. ‘नासा’ने म्हटले आहे की, हे छायाचित्र 30 नोव्हेंबर 1996 मध्ये ‘एसटीएस-80’ या मोहिमेवेळी कोलंबिया यानातील चालक दलाने टिपले होते. 8,848 मीटर उंचीचे हे शिखर व्ही-आकाराच्या दरीजवळ दिसते. त्याच्या आसपास अनेक ग्लेशियरही दिसतात.
‘एसटीएस-80’ ही त्या वर्षातील शेवटची अंतराळ मोहीम होती. त्यावेळी टिपलेले हे छायाचित्र एव्हरेस्टचे अनोखे रूप दर्शवते. जगातील दहा सर्वोच्च पर्वतशिखरे हिमालयातच आहेत. त्यामध्येच एव्हरेस्टचा समावेश होतो. एव्हरेस्टला स्थानिक लोक सागरमाथा किंवा कोमोलांगमा या नावाने ओळखतात. समुद्रसपाटीपासून सर्वाधिक उंचीचा हा पर्वत आहे. त्यामुळे त्यालार ‘सागरमाथा’ हे नाव शोभणारेच आहे. चीन व नेपाळची सीमा या पर्वतशिखराजवळून जाते. त्याची उंची 8,848.86 मीटर असल्याचे 2020 मधील चिनी व नेपाळी अधिकार्यांच्या संयुक्त मोहिमेतून सांगण्यात आली होती. एव्हरेस्टकडे जगभरातील गिर्यारोहक आकर्षित होत असतात. सर एडमंड हिलरी आणि शेर्पा तेनसिंग यांनी ते 1953 मध्ये सर्वप्रथम सर केले होते. या पर्वतशिखराच्या चढाईसाठी दोन मुख्य मार्ग आहेत. त्यापैकी एक मार्ग नेपाळमध्ये आग्नेय बाजूने जातो. त्याला स्टँडर्ड रुट मानले जाते. दुसरा मार्ग तिबेटमध्ये उत्तरेस आहे.