

पुढारी ऑनलाईन डेस्क : Wedding Card Scam | भारतात दरवर्षी मोठ्या प्रमाणात विवाह होतात. सध्या लग्नसराईचा हंगाम सुरू झाला आहे, मात्र याच दरम्यान लग्नपत्रिकेद्वारे लोकांची फसवणूक झाल्याच्या घटना समोर येत आहेत. अलीकडेच सायबर क्राईम युनिटला लोकांनी व्हॉट्सॲप आणि इंस्टाग्रामवर आलेल्या लग्नपत्रिकांमुळे फसवणूक होत असल्याच्या तक्रारी केल्या आहेत.
हिमाचल प्रदेशातील शिमला, कांगडा आणि मंडी जिल्ह्यात अशा घटना घडल्या आहेत. तुम्हीही या नवीन फसवणुकीपासून सुरक्षित राहणे आवश्यक आहे. कारण, तुमची एक छोटीशी चूक फसवणुकीला कारणीभूत ठरू शकते.
सर्वप्रथम या फसवणुकीत काय होते ते समजून घ्या. सायबर ठग प्रथम व्हॉट्सॲप, इन्स्टाग्राम किंवा इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मद्वारे लोकांना लग्नपत्रिका पाठवतात. लग्नाचा मोसम सुरू झाल्याने लोकांना कोणीतरी लग्नाचं आमंत्रण पाठवलं आहे असा समज होतो. अशा परिस्थितीत लोक या लग्नपत्रिकांवर क्लिक करतात, आणि फसवणुकीला बळी पडतात.
मोबईलवर आलेल्या लग्नपत्रिकेला क्लिक करताच तुमच्या मोबाईल फोनमध्ये मैलवेयर व्हायरस येतो आणि एपीके अॅप इंस्टॉल होते. यानंतर हॅकर्स या व्हायरसच्या मदतीने मोबाईल हॅक करतात आणि तुमच्या बॅक खात्यातून पैसे काढून घेतात.
सर्वप्रथम हे लक्षात ठेवा की फेक मॅसेज अनोळखी नंबरवरून किंवा सोशल मिडियावरून येतात. त्यामुळे अनोळखी नंबरवरून आलेले मॅसेज कधीही उघडू नका किंवा त्यावर क्लिक करू नका.
पोलिसांकडून लोकांना सुचना दिल्या जात आहेत की, अनोळखी नंबरवरून आलेल्या लग्नाच्या कार्डला क्लिक किंवा डाऊनलोड करू नका.
तुमच्यासोबत कोणत्याही प्रकारची फसवणूक झाल्यास, तुम्ही अधिकृत नॅशनल सायबर क्राइम रिपोर्टिंग पोर्टल https://cybercrime.gov.in/ वर त्वरित तुमची तक्रार नोंदवू शकता.
तुम्ही अधिकृत क्रमांक १९३० वर फसवणुकीची तक्रार करू शकता.