

heart-touching viral video
कुत्रा हा एकमेव असा पाळीव प्राणी आहे जो स्वतःपेक्षाही जास्त आपल्या मालकावर प्रेम करतो. कितीही मोठे संकंट आले तरी तो आपल्या मालकाची साथ कधीच सोडत नाही. कुत्र्याचं आपल्या मालकाप्रती असणार्या निष्पाप प्रेमाचे अनेक प्रसंग तुम्ही ऐकले असतील. असाच कुत्रा आणि माणसातील अतूट नात्याची साक्ष देणारी हृदयद्रावक घटना हिमाचल प्रदेशातील चंबा जिल्ह्यातील भरमौर येथून समोर आली आहे. कडाक्याच्या थंडीत घराबाहेर पडणेही अशक्य असते, अशा परिस्थितीत 'पिटबुल'ने आपल्या मृत मालकाची साथ तब्बल चार दिवस सोडली नाही. पाळीव प्राण्याची निष्ठा अधोरेखित करणारा हा प्रसंग सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
विकसित राणा आणि पियुष हे दोन तरुण भरमौरमधील भरमणी मंदिराजवळ व्हिडिओ बनवण्यासाठी गेले होते. मात्र, हवामान बिघडल्याने आणि प्रचंड हिमवृष्टी झाल्याने हे दोन्ही तरुण तिथेच अडकले. बर्फात दबले गेल्याने त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. बेपत्ता तरुणांच्या शोधासाठी जेव्हा चार दिवसांनंतर बचाव पथक आणि स्थानिक ग्रामस्थ घटनास्थळी पोहोचले, तेव्हा समोरचे दृश्य पाहून सर्वांचेच डोळे पाणावले. पियुषचा मृतदेह बर्फाखाली गाडला गेला होता, मात्र त्याचा पाळीव कुत्रा त्याच ठिकाणी खंबीरपणे बसून होता.
शून्य अंशाखालील तापमानात पहारा गेल्या चार दिवसांपासून या मुक्या प्राण्याने अन्नाचा एक कणही घेतला नव्हता. हाडं गोठवणारी थंडी, वेगवान वारे आणि हिमवृष्टीचा सामना करत हा कुत्रा आपल्या मालकाच्या मृतदेहाचे रक्षण करत होता. केवळ निसर्गाच्या कोपापासूनच नव्हे, तर जंगली श्वापदांपासूनही त्याने आपल्या मालकाचे संरक्षण केले.
बचाव कार्यात आला अडथळा बचाव पथकाने जेव्हा मृतदेह बाहेर काढण्याचा प्रयत्न केला, तेव्हा सुरुवातीला या कुत्र्याने आक्रमक पवित्रा घेतला. अनोळखी व्यक्ती आपल्या मालकाला इजा पोहोचवतील, असे कदाचित त्याला वाटले असावे. मात्र, बराच वेळ त्याला शांत केल्यानंतर आणि विश्वासात घेतल्यावर, हे लोक मदतीसाठी आले असल्याची खात्री पटताच तो बाजूला झाला. त्यानंतर प्रशासनाला मृतदेह ताब्यात घेता आला. पाळीव प्राण्याची निष्ठा अधोरेखित करणारा हा प्रसंग सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.