

Viral News
नवी दिल्ली : सध्या मुलींच्या अपेक्षा प्रचंड वाढल्या आहेत. स्थळं बघायला गेलं की नोकरी, पैसा, गाडी, घर या निकषांवर मुलांना तोललं जातं. परिणामी अनेक तरुणांचं लग्न करणं अवघड झालं आहे. अशीच व्यथा असलेल्या एका तरुणाने थेट पंचायत समितीचे विकास अधिकारी आणि नायब तहसीलदारांना माझं लग्न करून द्या, असा अर्जच केला आहे.
हे अनोखे प्रकरण सध्या राजस्थानच्या हनुमानगड जिल्ह्यात चर्चेचा विषय बनले आहे. 'माझे लग्न करून द्या, मला एक अशी पत्नी हवी आहे जी माझ्या वृद्ध आई-वडिलांची काळजी घेईल,' असा आपल्या लग्नासाठी अर्ज तरूणाने थेट पंचायत समितीच्या कार्यालयात दाखल केला आहे.
हनुमानगड जिल्ह्यातील एनटीआर गावात राहणारा ३३ वर्षीय श्रवण सुथार नावाचा तरुण रोजंदारीवर काम करतो. तो आपल्या वृद्ध आई-वडिलांसोबत राहतो. मात्र, कामामुळे त्याला त्यांच्याकडे पुरेसं लक्ष देता येत नाही. याच कारणामुळे त्याने पंचायत समितीचे विकास अधिकारी आणि नायब तहसीलदार यांच्याकडे मदतीसाठी धाव घेतली. श्रवणने अधिकाऱ्यांकडे केलेल्या लेखी निवेदनात म्हटले आहे की, 'मी रोज कामावर जातो, त्यामुळे मला माझ्या वृद्ध आई-वडिलांची सेवा करता येत नाही. माझी लग्न करण्याची व्यवस्था करावी, जेणेकरून कामावर असताना माझी पत्नी माझ्या आई-वडिलांची काळजी घेऊ शकेल.'
राजस्थान ग्रामीण सेवा शिबिरादरम्यान श्रवणने हा अर्ज सादर केला. त्याचे हे पत्र सोशल मीडियावर व्हायरल झाले असून, लोक यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. काहीजण या घटनेला विनोदी दृष्टीने पाहत आहेत, तर काहीजण श्रवणची अडचण आणि आपल्या आई-वडिलांबद्दलची त्याची भावना समजून घेत आहेत.
प्रशासकीय नियमांनुसार, अशा प्रकारच्या अर्जावर थेट लग्न लावून देण्याची कोणतीही तरतूद नाही. मात्र, अधिकाऱ्यांनी या प्रकरणाची दखल घेतली आहे. अधिकाऱ्यांनी सांगितले की, ते श्रवणला सरकारी योजना किंवा इतर माध्यमातून शक्य ती सर्व मदत करण्याचा प्रयत्न करतील. श्रवणच्या या अनोख्या अर्जाची सध्या प्रशासकीय वर्तुळातही जोरदार चर्चा सुरू आहे.