

Viral News
मेरठ: उत्तर प्रदेशातील मेरठमध्ये लग्नाच्या पहिल्या रात्रीच रहस्यमयरित्या बेपत्ता झालेला नवरदेव पाच दिवसांच्या शोधमोहिमेनंतर हरिद्वारमध्ये सापडला. मोहसिन उर्फ मोनू असे त्याचे नाव आहे. नेमकं काय झालं होत त्या रात्री वाचा सविस्तर...
मोहसीनचे लग्न पाच दिवसांपूर्वी मुझफ्फरनगरमध्ये झाले होते. लग्नाच्या रात्री तो वधूच्या खोलीत झोपायला गेला. खोलीत वधूने त्याला दुधाचा ग्लास दिला आणि खोलीत खूप जास्त प्रकाश असल्याने एक छोटा बल्ब आणण्यास सांगितले. त्यानंतर मोहसीन बाहेर बल्ब आणण्यासाठी गेला तो परतलाच नाही.
रात्री उशिरापर्यंत तो परत आला नसल्याने तिने कुटुंबीयांना सांगितले. त्यांनी त्याचा शोध सुरू केला. नातेवाईकांनी संपूर्ण परिसर शोधूनही काही माहिती न मिळाल्याने, त्यांनी पोलिसांना माहिती दिली. कुटुंबीयांच्या तक्रारीवरून पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज तपासले, ज्यामध्ये मोहसिन शेवटचा गंग कालव्याजवळ दिसला. त्यानंतर पोलिसांनी कालव्यातही त्याचा शोध घेतला पण सापडला नाही.
तब्बल पाच दिवसांनी मोहसिनने एका नातेवाईकाला फोन केला आणि तो हरिद्वारमध्ये असल्याचे सांगितले. ही कुटुंबीयांसाठी मोठी दिलासादायक बातमी होती. कुटुंबीयांनी तत्काळ पोलिसांना कळवले. कुटुंबीयांसह पोलिसांचे एक पथक हरिद्वारसाठी रवाना झाले आणि त्यांनी मोहसिनला सुखरूप ताब्यात घेतले.
चौकशीदरम्यान मोहसिनने सांगितले की, तो आपल्या वधूजवळ गोंधळून गेला होता आणि त्याला जास्त चिंता वाटत होती, ज्यामुळे त्याला खूप मानसिक ताण आला. त्यामुळे कोणालाही न सांगता तो घरातून बाहेर पडला आणि हरिद्वारला पोहोचेपर्यंत चालत राहिला.
मोहसिनच्या अचानक बेपत्ता होण्याने घरात दु:खाच वातावरण पसरले होते. पाच दिवसांपासून नातेवाईक रडत होते, कारण तो कालव्यात पडला असेल अशी भीती त्यांना होती. त्याच्या सुखरूप परतण्यामुळे लग्नाच्या रात्रीपासून कुटुंबीयांमध्ये असलेली चिंता अखेर संपली.