Land Kara De Bhai: ‘लँड करा दे भाई...', एका व्हायरल मीमने बदललं आयुष्य; एका व्हिडीओतून कमावले तब्बल २२ लाख रुपये, कसा घडला चमत्कार?

Viplav Sahu Meme Earnings: 'लँड करा दे भाई' या व्हायरल व्हिडीओमुळे प्रसिद्ध झालेल्या विपिन साहू यांनी मीम्सचे हक्क विकून २२ लाख रुपये कमावल्याचा खुलासा केला आहे.
Land Kara De Bhai
Land Kara De BhaiPudhari
Published on: 
Updated on: 

Viplav Sahu Meme Earnings: सोशल मीडियावर एखादा व्हिडीओ कधी आणि कसा व्हायरल होईल, याचा अंदाज बांधणे कठीण आहे. काही सेकंदांचा व्हिडीओ एखाद्याला रातोरात प्रसिद्धी मिळवून देऊ शकतो. असाच अनुभव विपिन साहू यांना आला. २०१९ मध्ये पॅराग्लायडिंग करताना त्यांनी घाबरून म्हटलेलं ‘१००-२०० रुपये ज्यादा ले ले पर लैंड करा दे भाई’ हे वाक्य आजही अनेकांच्या लक्षात आहे.

या व्हिडीओमुळे ते सोशल मीडियावर प्रचंड लोकप्रिय झाले. विशेष म्हणजे, या एका व्हायरल व्हिडीओच्या मीम्सचे हक्क विकून त्यांनी तब्बल २२ लाख रुपये कमावल्याचा खुलासा केला आहे. याशिवाय यूट्यूबमधूनही त्यांना जवळपास २० लाख रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे.

विपिन साहू यांनी एका कंटेंट क्रिएटरला दिलेल्या मुलाखतीत आपल्या कमाईबद्दल आणि व्हायरल झाल्यानंतर आयुष्यात झालेल्या बदलांबद्दल सांगितले. सोशल मीडियावर मिळालेल्या प्रसिद्धीचा आर्थिक फायदा कसा झाला, याची माहितीही त्यांनी या मुलाखतीत दिली.

२०१९ मधील पॅराग्लायडिंगचा व्हिडीओ झाला व्हायरल

विपिन साहू यांचा हा प्रसिद्ध व्हिडीओ २०१९ मधील आहे. त्यावेळी ते हिमाचल प्रदेशमध्ये पॅराग्लायडिंग करण्यासाठी गेले होते. मात्र, हवेत उंच गेल्यानंतर त्यांना भीती वाटू लागली. त्यामुळे त्यांनी पॅराग्लायडिंग करणाऱ्या व्यक्तीला वारंवार खाली उतरवण्याची विनंती केली.

यावेळी ते, '१००-२०० रुपये ज्यादा ले ले पर लैंड करा दे भाई', असे म्हणताना दिसले. त्यांच्या बोलण्याची पद्धत आणि घाबरलेला चेहरा लोकांना चांगलाच भावला. हा व्हिडीओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल झाला. त्यानंतर त्यातील संवादावर अनेक मीम्स तयार झाले. 'लँड करा दे भाई' हे वाक्य तर इंटरनेटवर चांगलेच लोकप्रिय झाले. याच एका व्हिडीओमुळे विपिन साहू यांना देशभरात ओळख मिळाली.

Land Kara De Bhai
PM Modi GTA 6 Post: १३ वर्षांत भारत किती बदलला? GTA 6च्या निमित्ताने मोदींचा काँग्रेसवर निशाणा; सोशल मीडियावर पोस्ट व्हायरल

मीम्सच्या हक्कांतून २२ लाखांची कमाई

व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर विपिन साहू यांना केवळ प्रसिद्धीच मिळाली नाही, तर त्यातून कमाईची संधीही निर्माण झाली. त्यांनी मुलाखतीत सांगितले की, आपल्या व्हायरल व्हिडीओशी संबंधित मीम्सचे हक्क विकून त्यांनी २२ लाख रुपये कमावले. याशिवाय यूट्यूबच्या माध्यमातून त्यांना जवळपास २० लाख रुपयांचे उत्पन्न मिळाले.

म्हणजेच, एका पॅराग्लायडिंग व्हिडीओमुळे त्यांना ओळख मिळण्यासोबतच आर्थिक फायदाही झाला. सोशल मीडियावरील कंटेंटचा योग्य वापर केल्यास त्यातून कमाईचे मार्ग कसे तयार होऊ शकतात, याचे हे उदाहरण मानले जात आहे.

विपिन साहू यांचे अनेक व्यवसाय

विपिन साहू यांनी मुलाखतीत आणखी एक महत्त्वाची माहिती दिली. सोशल मीडियावर प्रसिद्ध होण्यापूर्वीही ते स्वतःचे व्यवसाय सांभाळत होते. त्यांच्या मालकीची जिम आणि टाइल्सचे शोरूम आहे. भारतासोबतच जॉर्जियामध्येही त्यांचा व्यवसाय आहे. सध्या ते जॉर्जियामध्ये राहत असल्याचेही त्यांनी सांगितले.

त्यामुळे सोशल मीडियावर प्रसिद्ध होणे हा त्यांच्या आयुष्यातील एक वेगळा टप्पा असला, तरी त्यांची ओळख केवळ व्हायरल मीमपुरती मर्यादित नाही.

Land Kara De Bhai
Intel Layoffs 2026: इंटेलमध्ये पुन्हा नोकऱ्यांवर संकट! 9 महिन्यांत 4 हजार कर्मचाऱ्यांची कपात; अचानक असं काय घडलं?

सोशल मीडियावरील प्रसिद्धी कायम टिकत नाही

मुलाखतीत बोलताना विपिन साहू यांनी सोशल मीडियावरील प्रसिद्धीबद्दलही आपले मत मांडले. इंटरनेटवर एखादी व्यक्ती व्हायरल झाली की सुरुवातीला तिला मोठ्या प्रमाणात प्रसिद्धी मिळते. मात्र, ही प्रसिद्धी काही महिन्यांपुरतीच असते. त्यानंतर लोक नव्या ट्रेंडकडे आणि नव्या चेहऱ्यांकडे वळतात.

त्यामुळे नव्या कंटेंट क्रिएटर्सनी केवळ व्हायरल होण्याच्या मागे धावू नये, असा सल्लाही त्यांनी दिला. प्रसिद्धीपेक्षा आपल्या कामावर लक्ष केंद्रित करणे महत्त्वाचे आहे. कारण सोशल मीडियावर मिळणारी लोकप्रियता कायमस्वरूपी नसते, असे विपिन साहू यांनी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.