Vinod Tawde : तावडेंना राज्यात नवी जबाबदारी दिली जाण्याची शक्यता

Vinod Tawde : तावडेंना राज्यात नवी जबाबदारी दिली जाण्याची शक्यता
Published on
Updated on

मुंबई; पुढारी वृत्तसेवा : राज्यात लोकसभा निवडणुकीत भाजपच्या दारुण कामगिरीनंतर आता पक्षश्रेष्ठीच्या पातळीवर राज्यात भाकरी फिरविण्याचा गंभीरपणे विचार केला जात असल्याचे विश्सनीय वृत्त आहे. सध्या दिल्लीत असलेले भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांना राज्यात पाठवून देवेंद्र फडणवीस यांना दिल्लीत नवी जबाबदारी दिली जाण्याची शक्यता असल्याची भाजपच्या वर्तुळात चर्चा आहे. शुक्रवारी (दि.7) दुपारपर्यंत या विषयावर निर्णय होण्याची शक्यता आहे.

देवेंद्र फडणवीस यांनी आपल्याला सरकारमधून मुक्त करा अशी जाहीर भूमिका घेतल्यानंतर राज्याच्या राजकारणात खळबळ माजली. त्यांच्या या भूमिकेनंतर राज्यात भाजपच्या वर्तुळात नेमके काय घडणार याबद्दल चर्चा सुरू झाली. २०१९ मध्ये २५ जागा लढवून २३ जागा जिंकणाऱ्या भाजपला गेल्यावेळेपेक्षा ५ जागा अधिक लढूनही केवळ दोन आकडी संख्याही गाठता आली नाही. विदर्भ हा भाजपचा बालेकिल्ला मानला जात असताना आणि राज्याचे उपमुख्यमंत्री पद आणि भाजपचे प्रदेशाध्यक्षपद विदर्भात दिले असतानाही त्याचा फारसा लाभ पक्षाला झाल्याचे दिसत नाही. गेल्यावेळेस विदर्भातील १० पैकी ९ जागा जिंकणाऱ्या भाजपला यावेळेस केवळ दोन जागा जिंकता आल्या.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस लाणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या नागपूर जिल्ह्यातील रामटेक लोकसभा मतदारसंघात महायुतीच्या उमेदवाराचा पराभव झाला. यामुळे भाजप श्रेष्ठी संतप्त असून राज्यात भाकरी फिरविण्याच्या मनस्थितीत ते पोहोचले आहेत, अशी माहिती आहे.

तावडेंना सरकारमध्ये जबाबदारी

राज्यातील मराठा समाज भाजपवर नाराज असून त्यांच्या नाराजीचा फटका मोठ्या प्रमाणावर बसला आहे. सर्वाधिक फटका मराठवाड्यात बसलेला पहायला मिळाला. गेल्यावेळेस मराठवाडयात ८ पैकी ४ जागा जिंकणाऱ्या भाजपला या वेळेस एकही जागा जिंकता आली नाही. राज्याच्या अन्य भागातही मराठा समाजाने भाजपाला फारशी साथ दिली नाही. त्यामुळे राज्यात भाजपच्यावतीने सरकारचे नेतृत्व मराठा नेत्याकडे सोपविण्याचा पक्ष पातळीवर गंभीरपणे विचार सुरू आहे.

नवी दिल्लीत आपले पक्षसंघटन कौशल्य दाखवून देशातील काही राज्यात पक्षसंघटना भक्काम करणारे विनोद तावडे यांना राज्यात उपमुख्यमंत्री पदी बसवून त्यांच्या नेतृत्वात आगामी विधानसभा निवडणूक लढविण्याचा विचार पक्ष पातळीवर सुरू आहे. तावडे हे मराठा नेते असल्याने मराठा समाजाची नाराजी दूर करण्यात ते उपयुक्त ठरू शकतात, असे भाजपला वाटत आहे. २०१४ च्या फडणवीस सरकारमध्ये त्यांनी राज्यात मंत्री पदी काम केले आहे. त्यामुळे प्रशासन आणि पक्ष संघटना याचा अनुभव त्यांना आहे.

फडणवीसांना दिल्लीत नवी जबाबदारी?

फडणवीसांची बुध्दीमत्ता, संघटन कौशल्य आणि वक्तृत्व यांचा नवी दिल्लीत राष्ट्रीय पातळीवर वापर करून घेण्याचा विचाराही भाजपचे पक्ष श्रेष्टी करीत आहेत. त्यामुळेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या काही प्रमुख पदाधिकाऱ्यांनी त्यांची नागपूर येथील निवासस्थानी भोट घेऊन त्यांच्या नव्या जबाबदारीबद्दल चर्चा केल्याचे वृत्त आहे. या भेटीनंतर फडणवीस दिल्लीत संध्याकाळी दाखल झाले. त्यांची रात्री भाजपच्या प्रमुख नेत्यांशी बैठक झाली. भाजप पक्ष संघटनेते लवकरच मोठे फेरबदल होणार असून पक्षाध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्या जागी नव्या नेतृत्वाला संधी दिली जाण्याची शक्यता आहे. पक्षाच्या या नव्या राष्ट्रीय कार्यकारिणीत फडणवीसांना महत्वाची जबाबदारी दिली जाण्याची शक्यता आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news