

5G NETWORK ROW : 'इंटरनेट कनेक्टिव्हिटी' ही आजची मूलभूत गरज झाली आहे. त्यामुळे अवघ्या काही सेकंदांसाठी इंटरनेट नेटवर्क गायब झाले किंवा त्याचा स्पीड मंदावला तरी सारेच अस्वस्थ होतात. याच समस्येमुळे ग्राहकांचा संताप कसा अनावर होतो, याचा धक्कादायक अनुभव उत्तर प्रदेशातील फतेहपूर जिल्ह्यातील एका गावात आला. खराब मोबाईल कनेक्टिव्हिटीमुळे संतापलेल्या ग्रामस्थांनी गुरुवारी एका टेलिकॉम तंत्रज्ञाला ओलीस ठेवून चक्क कंपनीच्या इंटरनेट टॉवरलाच बांधले.
गावात दोन वर्षांपासून 'इंटरनेट कनेक्टिव्हिटी' समस्या कायम होती. अखेर मोबाईल कंपनीचा 'टेक्निशियन' गावात आल्यानंतर ग्रामस्थांच्या संयमाचा बांध फुटला. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यामध्ये एका व्यक्तीचे दोन्ही हात वर करून खांबाला (टॉवरला) बांधल्याचे स्पष्ट दिसत आहे. व्हिडिओ रेकॉर्ड करणारी व्यक्ती सांगत आहे की, "हा व्हिडिओ आमच्या हरदौली गावातील आहे. ही (व्यक्ती) जिओ नेटवर्ककडून आली आहे. येथे दोन वर्षांपासून नेटवर्कची समस्या सुटत नाहीये. लाईट असते, पण नेटवर्क नसते. आम्ही ५G चे रिचार्ज करतो, पण समस्या कायम आहे. म्हणूनच जिओच्या टेक्निशियनला बांधले आहे. जोपर्यंत यांचे अधिकारी येत नाहीत, तोपर्यंत यांना सोडणार नाही." व्हिडिओमध्ये ग्रामस्थ गेल्या दोन वर्षांपासून कनेक्टिव्हिटीच्या समस्येला तोंड देत असल्याचे सांगताना ऐकू येत आहेत.
हरदौली गाव फतेहपूर जिल्हा मुख्यालयापासून ३० किलोमीटर अंतरावर आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,आदित्य भान सिंग हे तंत्रज्ञ हरदौली गावात टॉवरवर काम करत असताना स्थानिक लोकांनी त्यांना घेरले. माहिती मिळताच पोलीस पथक घटनास्थळी पोहोचले, परंतु तोपर्यंत ग्रामस्थांनी त्यांना सोडून दिले होते.
शुक्रवारी पोलिसांनी घटनास्थळी उपस्थित सात जणांची ओळख पटवली असून त्यापैकी सहा जणांना बेकायदेशीरपणे डांबून ठेवल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे. बिंदकी पोलीस ठाण्याचे अधिकारी शैलेश कुमार सिंह म्हणाले, "आम्ही त्यांना शांतता भंगाच्या आरोपाखालीही अटक केली आहे."
तपासादरम्यान स्थानिकांनी दावा केला की, ते ५जी प्लॅनसाठी डेटा पॅकेज खरेदी करत होते, परंतु त्याऐवजी त्यांना खराब ४जी कनेक्टिव्हिटी मिळत होती आणि काही वेळातच त्यांचे फोन कनेक्शन तुटत होते, असे पोलिसांनी सांगितले. पोलीस म्हणाले की, सिंग टॉवरची पाहणी करण्यासाठी प्रथमच गेले होते. गेल्या तीन महिन्यांत टॉवरवर एकही कर्मचारी आला नव्हता, असा दावा स्थानिकांनी केला आहे. सिंग सुमारे तीन महिन्यांपूर्वी या कंपनीत रुजू झाले होते. फतेहपूरचे पोलीस अधीक्षक (एसपी) अभिमन्यू मांगलिक यांनी सांगितले की, सोशल मीडियाद्वारे ही घटना निदर्शनास आल्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
'इकॉनॉमिक टाईम्स'च्या वृत्तानुसार, गावात कोणीतरी सांगितले की आदित्यभानला टॉवरला बांधा, तरच समस्या सुटेल. तथापि, टेक्निशियननेच गावातील लोकांना असे करण्यास सांगितले होते असाही दावा केला जात आहे, जेणेकरून त्याच्या कंपनीला नेटवर्कच्या तक्रारीकडे त्वरित लक्ष देण्याची गरज असल्याचे पुरावे मिळतील. याची माहिती पोलिसांपर्यंत पोहोचली, त्यांनी घटनास्थळी पोहोचून आदित्यभान यांची सुटका केली.