

नवी दिल्ली : उपराष्ट्रपती निवडणुकीपूर्वी दिल्लीत भारतीय जनता पक्षाची २ दिवसांची कार्यशाळा सुरू झाली. पंतप्रधान नरेंद्र मोदींसह प्रमुख केंद्रीय मंत्री, भाजप नेते आणि सर्व खासदारांनी या कार्यशाळेत भाग घेतला. कार्यशाळेत उपराष्ट्रपती निवडणुकीच्या तयारीवर चर्चा झाली. खासदारांनी जीएसटी सुधारणांसाठी पंतप्रधान मोदींचे अभिनंदनही केले. दरम्यान, या कार्यशाळेत पंतप्रधान सर्वात शेवटी बसल्याचे पहायला मिळाले. ते फोटोही मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला.
९ सप्टेंबरला उपराष्ट्रपती निवडणूक होत आहे. तत्पूर्वी रविवारपासून भाजपची दोन दिवसांची कार्यशाळा सुरू झाली. खुद्द पंतप्रधान मोदी यांच्यासह पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा आणि सर्व भाजप खासदारांनी या कार्यशाळेत भाग घेतला. उपराष्ट्रपती निवडणुकीच्या तयारीबाबत भाजप खासदारांसाठी ही कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे. रविवारी सकाळी सुरू झालेल्या या कार्यशाळेत, भाजप खासदारांनी जीएसटी सुधारणांसाठी पंतप्रधान मोदींचे अभिनंदन केले.भाजपच्या दोन दिवसांच्या कार्यशाळेचे उद्दिष्ट कायदेविषयक कौशल्ये, प्रशासन धोरणे आणि राजकीय संवाद यावर लक्ष केंद्रित करणे आहे. नेत्यांनी केंद्र सरकारचा विकास अजेंडा पुढे नेण्यासाठी आणि विरोधकांना तोंड देण्याच्या मार्गांवर चर्चा केली. रविवारनंतर सोमवारी आणखी ३ तासांचे सत्र होणार आहे.
पंतप्रधान मोदींच्या अभिनंदनाचा ठराव पारित
भाजपच्या कार्यशाळेच्या पहिल्या दिवशी एक महत्त्वपूर्ण ठराव पारित करण्यात आला. जीएसटी स्लॅबच्या नव्या बदलांच्या संदर्भात पंतप्रधान मोदींचे अभिनंदन करणारा ठराव मांडण्यात आला होता. सर्व उपस्थितांनी एकमताने या ठरावाला पाठिंबा दिला.
या कार्यशाळेबाबत बोलताना भाजप खासदार जगदंबिका पाल म्हणाले की, भाजपमध्ये कार्यशाळा आयोजित केल्या जातात, जिथे खासदारांना त्यांच्या मतदारसंघातील भूमिका, विकास, जनसंपर्क आणि लोकांपर्यंत पोहोचण्याचे मार्ग सांगण्यासाठी चर्चा केली जाते. मला वाटते की कार्यकारी आणि प्रशासकीय क्षेत्रातील अधिकाऱ्यांसाठी ज्याप्रमाणे रिफ्रेशर कोर्सेस असतात, त्याचप्रमाणे भाजप हा एकमेव राजकीय पक्ष आहे जो वेळोवेळी आपल्या खासदार, आमदार आणि प्रतिनिधींसाठी कार्यशाळा आयोजित करतो. यामध्ये राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय घडामोडी, व्यावहारिक पैलूंवर चर्चा केली जाते.
जीएसटी सुधारणांचे कौतुक
जगदंबिका पाल यांनी जीएसटी सुधारणांसाठी सरकारचे कौतुक केले. ते म्हणाले, पंतप्रधान मोदींनी जीएसटी सुधारणांबाबत मोठा निर्णय घेतला आहे, आम्ही आंतरराष्ट्रीय शुल्काच्या दबावाखाली होतो, हा निर्णय त्याला पर्याय आहे. भाजप कार्यशाळेत या प्रकारच्या मुद्द्यांवर चर्चा झाली. याचेवेळी विरोधकांवर निशाणा साधताना ते म्हणाले की, पूर्वी विरोधक जीएसटीला गब्बर सिंग टॅक्स म्हणत असत. आता ते जीएसटीचे श्रेय घेण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र संपूर्ण देशाला त्यांचे सत्य माहित आहे, असेही ते म्हणाले.
भाजपच्या दोन दिवसांच्या कार्यशाळेचे उद्दिष्ट कायदेविषयक कौशल्ये, प्रशासन धोरणे आणि राजकीय संवाद यावर लक्ष केंद्रित करणे आहे. नेत्यांनी केंद्र सरकारचा विकास अजेंडा पुढे नेण्यासाठी आणि विरोधकांना तोंड देण्याच्या मार्गांवर चर्चा केली. रविवारनंतर सोमवारी आणखी ३ तासांचे सत्र होणार आहे.
रविवारच्या सत्रात काय झाले?
रविवारी भाजपच्या कार्यशाळेत ३ महत्त्वपूर्ण सत्र झाली. यामध्ये पंतप्रधान मोदींनी १५ ऑगस्टच्या भाषणात जो संदेश दिला तो कसा पुढे न्यायचा तसेच संसदेच्या स्थायी समित्या आणि सोशल मिडीया हाताळणी या ३ विषयांवर मार्गदर्शन करण्यात आले. केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव, पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे आणि ज्येष्ठ नेते डॉ. विनय सहस्रबुध्दे या तिघांच्या सुकाणू समितीने हे कार्यक्रम ठरवले असल्याचे समजते.
सोमवारी या कार्यशाळेत उपराष्ट्रपती निवडणुकीतील मतदानाबद्दल सविस्तर माहिती दिली जाणार आहे. विशेषतः नव्या खासदारांना ही माहिती उपयुक्त असेल. मतदान कसे करावे, त्याची प्रक्रिया याविषयी ही माहिती दिली जाईल. मतदानासंबंधी रंगीत तालीम देखील घेतली जाण्याची शक्यता आहे.