

Vice President Election 2025
नवी दिल्ली : देशाच्या १७ व्या उपराष्ट्रपती निवडणुकीसाठी आज संसद भवनात मतदान होत आहे. एनडीएचे उमेदवार सीपी राधाकृष्णन आणि इंडिया आघाडीचे उमेदवार आणि सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश बी सुदर्शन रेड्डी यांच्यात ही लढत होत आहे. सकाळी १० वाजता मतदान प्रक्रिया सुरू झाली असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पहिले मतदान केले. लोकसभेचे ५४२ आणि राज्यसभेचे २३९ सदस्य मतदानाचा हक्क बजावणार आहेत.
उपराष्ट्रपती निवडणुकीत एकूण ७८० मतदार आहेत (राज्यसभा-२३८ आणि लोकसभा-५४२), विजयासाठी ३९१ खासदारांचा पाठिंबा आवश्यक आहे. एनडीएकडे ४२५ खासदार आहेत, युती व्यतिरिक्त वायएसआरसीपी (११ मते) ने देखील एनडीए उमेदवाराला पाठिंबा जाहीर केला आहे. आता बीजेडी, बीआरएस, एसएडी उपराष्ट्रपती निवडणुकीतून दूर राहिल्यानंतर, निवडणुकीत विजयी मतांची संख्या ३८५ वर आली आहे. विरोधी आघाडीकडे ३२४ खासदार आहेत.
एनडीएचे उपराष्ट्रपतीपदाचे उमेदवार आणि महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन यांनी आज सकाळी नवी दिल्लीतील लोधी रोड परिसरातील श्री राम मंदिरात प्रार्थना केली.
बिजू जनता दल (बीजेडी), शिरोमणी अकाली दल (एसएडी) आणि भारत राष्ट्र समिती (बीआरएस) यांसारख्या प्रमुख पक्षांनी निवडणुकीपासून दूर राहण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे एनडीएची स्थिती आणखी मजबूत झाली आहे. जगदीप धनखड यांच्या राजीनाम्यानंतर ही निवडणूक होत आहे. सत्ताधारी एनडीएचे लक्ष विजयावर आहे. यासाठी भाजपने काँग्रेसपासून समान अंतर राखणाऱ्या पक्षांना आपल्याकडे खेचण्याचा प्रयत्न केला आहे. भाजपच्या सूत्रांनी दावा केला आहे की, त्यांना अशा 48 खासदारांचा पाठिंबा मिळेल, जे भाजप आणि काँग्रेसपासून समान अंतर राखतात. याशिवाय, भाजपची नजर तीन अपक्ष खासदार आणि जेडपीएम (ZPM) आणि व्हीओटीटीपी (VOTTP) यांच्या प्रत्येकी एका मतावरही आहे.