

एप्रिल २०११ मध्ये सत्यसाईबाबा यांचे निधन झाले. यावेळी मादुरो परराष्ट्रमंत्री होते. सत्यसाईबाबा यांनी "मानवतेसाठी दिलेल्या आध्यात्मिक योगदानाला" औपचारिक मान्यता देण्यासाठी व्हेनेझुएलामध्ये एक दिवसाचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर करण्यात आला होता.
Venezuela President Nicolas Maduro
नवी दिल्ली : अमेरिकेने व्हेनेझुएलावर हल्ला करत देशाच्या राष्ट्राध्यक्षांना अटक केली. यानंतर जगभरात निकोलस मादुरो यांचे नाव चर्चेत आले. त्यांच्यासह त्यांच्या पत्नी सिलिया फ्लोरेस यांना अटक करून व्हेनेझुएलामधून बाहेर पाठवण्यात आले आहे. आता या दाम्पत्याचे भारताशी असलेले आध्यात्मिक नाते समोर आले आहे. मादुरो आणि फ्लोरेस हे दोघेही सत्य साई बाबांचे अनुयायी असल्याची माहिती समोर आली आहे.
निकोलस मादुरो आणि त्यांच्या पत्नी सिलिया फ्लोरेस हे पुट्टपर्थीचे आध्यात्मिक गुरु सत्यसाई बाबांचे अनुयायी आहेत. कॅथोलिक कुटुंबात जन्मलेल्या मादुरो यांची ओळख त्यांच्या पत्नीमुळे साईबाबांशी झाली. २००५ मध्ये या दांपत्याने आंध्र प्रदेशातील पुट्टपर्थी येथील 'प्रशांती निलयम' आश्रमाला भेट देऊन साईबाबांचे दर्शन घेतले होते. त्यांच्या या भेटीचा एक जुना फोटो सध्या चर्चेत आहे, ज्यामध्ये मादुरो आणि फ्लोरेस जमिनीवर बसून साईबाबांशी चर्चा करताना दिसत आहेत.
रिपोर्टनुसार, मादुरो व्हेनेझुएलाचे राष्ट्राध्यक्ष झाले तेव्हा मिराफ्लोरेस पॅलेसमधील त्यांच्या खाजगी कार्यालयाच्या भिंतींवर सायमन बोलिव्हार आणि ह्यूगो चावेझ यांच्या चित्रांसोबत साई बाबांचे चित्र प्रमुखपणे लावले होते.
एप्रिल २०११ मध्ये सत्यसाईबाबा यांचे निधन झाले. यावेळी मादुरो हे परराष्ट्रमंत्री होते. त्यांनी सभागृहात अधिकृत शोक प्रस्तावासाठी आग्रह धरला. त्यांच्या मार्गदर्शनाखाली व्हेनेझुएला संसदेत राष्ट्रीय विधानसभेने एक अधिकृत शोक प्रस्ताव मंजूर केला. सत्यसाईबाबा यांनी "मानवतेसाठी दिलेल्या आध्यात्मिक योगदानाला" औपचारिक मान्यता देण्यासाठी एक दिवसाचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर करण्यात आला होता.
अनेक परदेशी संस्थांना देशातून हाकलून लावण्यात आले असतानाही, त्यांच्या राजवटीत सत्य साई संघटना व्हेनेझुएलामध्ये कार्यरत राहिली. व्हेनेझुएलामध्ये १९७४ पासूनच लॅटिन अमेरिकेतील सर्वात मोठा साई बाबांच्या भक्तांचा समुदाय आहे. २०२४ मध्ये व्हेनेझुएला सरकारने आपल्या राष्ट्रीय दिनाच्या सोहळ्यासाठी "ओम" चिन्हाचे वैशिष्ट्य असलेली आमंत्रणे पाठवली होती.
मादुरो यांचा जन्म २३ नोव्हेंबर १९६२ रोजी एका कामगार कुटुंबात झाला. ते एका कामगार संघटनेच्या नेत्याचे पुत्र होते. १९९२ मध्ये लष्करी अधिकारी चावेझ यांनी केलेल्या अयशस्वी सत्तापालटाच्या प्रयत्नावेळी ते बस चालक होते. त्यांनी चावेझ यांच्या तुरुंगातून सुटकेसाठी आंदोलन केले. त्यांनी कट्टर डाव्या विचारसरणीला पाठिंबा दिला. १९९८ मध्ये चावेझ यांच्या निवडणुकीनंतर मादुरो यांनी प्रथमच सार्वजनिक निवडणूक जिंकली. लॅटिन अमेरिकेतील अमेरिकेच्या हस्तक्षेपाविरुद्ध स्वयंघोषित क्रांतीचे समर्थन त्यांनी केले. यानंतर त्यांचा राजकीय आलेख चढता राहिला. राष्ट्रीय विधानसभेचे अध्यक्ष आणि नंतर परराष्ट्र मंत्री झाले. याच काळात त्यांनी तेल-अनुदानित मदत कार्यक्रमांद्वारे इतर विकसनशील देशांशी युती निर्माण करण्यासाठी जगभर प्रवास केला. २०१३ मध्ये चावेझ यांच्या मृत्यूनंतर मादुरो यांची अध्यक्षपदी निवड झाली.
चावेझ यांच्यासारखा करिष्मा मादुरो यांच्याकडे नसल्याची टीका विरोधकांनी वारंवार केली. त्यांच्या कारकीर्दीत देशात जीवनावश्यक वस्तूंची टंचाई सुरू झाली. २०१८ मध्ये त्यांच्यावर ड्रोनद्वारे प्राणघातक हल्ला करण्याचा प्रयत्नही झाला. यानंतर त्यांनी सार्वजनिक कार्यक्रमांतील हजेरी कमी केली. त्यांच्या राजकीय प्रवासात त्यांच्या पत्नी सिलिया फ्लोरेस त्यांच्या सोबत कायम राहिल्या आहेत. मात्र मागील एका दशकात मादुरो यांची राजकीय कारकीर्द वादग्रस्त राहिल्याने कारवाई केल्याचा दावा अमेरिका करत आहे.