

नवी दिल्ली : व्हेनेझुएलातील अलीकडील राजकीय आणि सामाजिक घडामोडींच्या पार्श्वभूमीवर भारत सरकारच्या परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाने भारतीय नागरिकांसाठी मार्गदर्शक सूचना (ट्रॅव्हल ॲडव्हायझरी) जारी केल्या आहेत. व्हेनेझुएलातील सद्यस्थिती पाहता, भारतीय नागरिकांनी अत्यंत आवश्यक कामाशिवाय त्या देशाचा प्रवास करणे टाळावे, असे आवाहन केंद्र सरकारकडून अधिकृतपणे करण्यात आले आहे.
परराष्ट्र मंत्रालयाने जारी केलेल्या पत्रकानुसार, जे भारतीय नागरिक सध्या व्हेनेझुएलामध्ये वास्तव्यास आहेत, त्यांनी कमालीची सतर्कता बाळगणे आवश्यक आहे. तेथील भारतीयांनी आपल्या हालचालींवर मर्यादा ठेवाव्यात आणि शक्यतो सुरक्षित ठिकाणी राहावे, अशा सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच, कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीत मदतीसाठी नागरिकांनी काराकस येथील भारतीय दूतावासाच्या सातत्याने संपर्कात राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
नागरिकांच्या मदतीसाठी भारतीय दूतावासाने संपर्क यंत्रणा सज्ज ठेवली असून, नागरिक cons.caracas@mea.gov.in या ईमेलवर किंवा +58-412-9584288 या तातडीच्या फोन नंबरवर संपर्क साधू शकतात. परिस्थितीचा गांभीर्याने विचार करून भारतीय प्रवाशांनी या सूचनांचे पालन करावे, असे परराष्ट्र मंत्रालयाने स्पष्ट केले आहे.