

Diwali Vasubaras Punganur cow
दिवाळीचा पहिला दिवस म्हणजे वसुबारस. आश्विन महिन्यातील कृष्ण पक्षातील द्वादशी तिथीला वसुबारस साजरी करण्यात येते. वसुबारस म्हणजेच गोवत्स द्वादशी. वसुबारस या शब्दातील वसू म्हणजे धन व त्यासाठी असलेली बारस म्हणजे द्वादशी. पशु हे धन मानून गाय व वासराच्या नात्यातील पावित्र्य स्मरण्याचा हा दिवस. 'स्वदुग्धे सदा पोशिते जी जगाला, स्वपुत्रास दे जी कृषी चालवाया, नमस्कार त्या दिव्य गो देवतेला' असे म्हटले जात असते. सध्या पुंगनूर गाय ही भारतात आणि सोशल मीडियावर खूप लोकप्रिय होत आहे.
पुंगनूर गाय ही जगातील सर्वात लहान उंचीच्या देशी गोवंशापैकी एक आहे. तिची उंची साधारणपणे ६० सेंटीमीटर ते ९० सेंटीमीटर (जवळपास अडीच ते तीन फूट) असते, ज्यामुळे ती दिसायला खूप आकर्षक आणि लहान वासरासारखी वाटते. ही गाय दिवसाला ३ ते ५ लिटर दूध देते. परंतु तिच्या दुधातील फॅटचे प्रमाण सामान्य गायींच्या दुधापेक्षा खूप जास्त म्हणजे सुमारे ८ टक्क्यांपर्यंत असते. उच्च गुणवत्तेमुळे तिरुपती मंदिरात प्रसाद बनवण्यासाठी या गायीच्या दुधापासून बनवलेल्या तुपाचा वापर केला जातो.
पुंगनूर गायीची उत्पत्ती कोठे झाली?
पुंगनूर गाय भारताचा असा खजिना आहे ज्याचे जतन आणि संवर्धन करणे आवश्यक आहे. पुंगनूर गाईला तिच्या मूळ ठिकाणाचे म्हणजेच दख्खनच्या पठाराच्या आग्नेय टोकावर असलेल्या चित्तूर जिल्ह्यातील पुंगनूर शहराचे नाव देण्यात आले आहे. पुंगनूरच्या राजांनी या जातीचा विकास केला आणि ते त्यांचा उपयोग दुधासाठी आणि इतर हलक्या कृषी कार्यांसाठी करत असत. ही जात १५ व्या शतकात विजयनगरच्या राजांनी या प्रदेशात आणलेल्या ओंगोल गुरांमधून विकसित झाली असावी असे मानले जाते. या जातीवर स्थानिक डोंगराळ गुरांचा आणि पाकिस्तानमधील साहिवाल गुरांचा देखील प्रभाव आहे. पुंगनूर गाईचा सांस्कृतिक आणि आर्थिक महत्त्व लक्षात घेऊन स्थानिक लोक तिचा खूप आदर करत आले आहेत आणि तिचा इतिहास खूप जुना आहे.
पुंगनूर गाय एक दुर्मिळ आणि संकटात असलेली जात आहे, ज्याचे फक्त काही प्राणी शिल्लक आहेत. चित्तूर जिल्ह्यातील पालामानेर येथील पशुधन संशोधन केंद्र हे पुंगनूर गाईच्या संवर्धन आणि प्रजननाचे मुख्य केंद्र आहे. या जातीचे संवर्धन करण्यासाठी काही स्वयंसेवी संस्था आणि शेतकरी देखील प्रयत्नशील आहेत, ज्यांना भारतातील स्थानिक गोवंशाचे जतन करण्यात रस आहे.
गाईंशी भारताचे नाते इतिहास, संस्कृती आणि अध्यात्मिकतेत खोलवर रुजलेले आहे. हिंदूंमध्ये गाईला पवित्र मानले जाते. त्यांचा संबंध कृष्णाशी जोडलेला आहे. संपत्तीचे आणि समृद्धीचे प्रतीक मानून सणांमध्ये त्यांची पूजा केली जाते. तज्ञांच्या मते, गाईचे दूध कॅल्शियम, फॉस्फरस, बी जीवनसत्त्वे, पोटॅशियम आणि जीवनसत्व डी सारख्या महत्वाच्या पोषक तत्वांनी समृद्ध असते.