Vande Bharat: हवेत तरंगणारी रेल्वे! जगातील सर्वात उंच चिनाब पुलावरून ताशी १०० किमी वेगाने धावली 'वंदे भारत'; पाहा VIDEO

World's highest Chenab Bridge: जगातील सर्वात उंच अशा चिनाब पुलावरून 'वंदे भारत' ट्रेन पहिल्यांदाच ताशी जवळपास १०० किमी वेगाने धावली.
Vande Bharat train Chenab Bridge
Vande Bharat train Chenab BridgePTI
Published on
Updated on

Vande Bharat train Chenab Bridge

जम्मू-काश्मीर: जम्मू-काश्मीरच्या रियासी जिल्ह्यातील जगातील सर्वात उंच अशा चिनाब रेल्वे पुलावरून कटरा-श्रीनगर वंदे भारत एक्सप्रेस पहिल्यांदाच ताशी जवळपास १०० किमी वेगाने धावली. उत्तर रेल्वेच्या जम्मू विभागांतर्गत येणाऱ्या 'श्री माता वैष्णो देवी कटरा - बनिहाल' या १११ किलोमीटर लांबीच्या नवीन ब्रॉड गेज रेल्वे मार्गावर, गाड्यांचा कमाल वेग ताशी १०० किमीपर्यंत वाढवण्यास रेल्वे मंत्रालयाने नुकतीच मंजुरी दिली होती.

जगातील सर्वात उंच पुल अन् वंदे भारतचा ताशी १०० किमी वेग

'एएनआय' या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, श्री माता वैष्णो देवी कटरा आणि बनिहाल दरम्यानच्या १११ किमीच्या नवीन ब्रॉड गेज मार्गावर वंदे भारत एक्सप्रेसने पहिल्यांदाच ताशी जवळपास १०० किमीचा वेग गाठला. यापूर्वी मंगळवारी, अधिकाऱ्यांनी 'पीटीआय' या वृत्तसंस्थेला सांगितले होते की, या मार्गावर धावणाऱ्या गाड्यांसाठी कमाल वेग ताशी १०० किमीपर्यंत वाढवण्यात आला आहे.

रेल्वेने सुरक्षेशी संबंधित सर्व आवश्यक अटींची पूर्तता केल्यानंतर रेल्वे मंत्रालयाने वेगातील या वाढीस मंजुरी दिली, असे त्यांनी सांगितले. यापूर्वी, श्री माता वैष्णो देवी कटरा-संगालदान मार्गावर गाड्यांना ताशी जास्तीत जास्त ८५ किमी आणि संगालदान-बनिहाल मार्गावर ताशी ७५ किमी वेगाने धावण्याची परवानगी होती, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.

Vande Bharat train Chenab Bridge
Mehul Choksi Lawyer Arrested: मेहुल चोकसीचा वकील विजय अग्रवालला लंडनमध्ये अटक; दोन महिलांवर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप

प्रवासाचा वेळ कमी होणार?

जम्मूचे वरिष्ठ विभागीय वाणिज्य व्यवस्थापक उचित सिंघल यांनी सांगितले की, वाढलेल्या वेगामुळे प्रवासाचा वेळ कमी होईल आणि जम्मू व काश्मीरमधील संपर्क व्यवस्था सुधारेल. "वेगातील वाढीमुळे केवळ प्रवासाचा वेळच कमी होणार नाही, तर जम्मू-काश्मीरमधील संपर्क व्यवस्थाही अधिक मजबूत होईल. प्रवाशांना जलद, सुरक्षित आणि अधिक आरामदायक प्रवासाची सुविधा मिळेल. यामुळे या भागातील पर्यटन, व्यापार आणि आर्थिक घडामोडींनाही चालना मिळेल. रेल्वे प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी आणि सोयीसाठी सदैव कटिबद्ध आहे," असे त्यांनी 'पीटीआय'ला सांगितले.

तांत्रिकदृष्ट्या आव्हानात्मक मार्ग

१११ किमी लांबीचा कटरा-बनिहाल रेल्वे मार्ग हा उधमपूर-श्रीनगर-बारामुल्ला रेल्वे लिंक प्रकल्पाचा तांत्रिकदृष्ट्या कठीण भाग आहे. काश्मीर खोरे आणि देशाचा उर्वरित भाग यांच्यात अखंड रेल्वे संपर्क उपलब्ध करून देणे हे या प्रकल्पाचे उद्दिष्ट आहे. कटरा-बनिहाल मार्ग हा पीर पंजाल आणि हिमालयाच्या खालच्या रांगांमधील अत्यंत कठीण भूप्रदेशातून जातो. या मार्गावर खोल दऱ्या, डोंगरांचे तीव्र उतार, मोठ्या नद्या आणि गुंतागुंतीची भूगर्भीय रचना आहे.

कटरा-बनिहाल विभागात अनेक महत्त्वपूर्ण अभियांत्रिकी संरचनांचा समावेश आहे. यामध्ये रियासीजवळील चिनाब नदीवर बांधलेला 'चिनाब रेल्वे पूल' आणि भारताचा पहिला 'केबल-स्टे' रेल्वे पूल असलेला 'अंजी खड्ड रेल्वे पूल' यांचा समावेश होतो. या मार्गावर ३३ बोगदे देखील आहेत.

Vande Bharat train Chenab Bridge
Supreme Court Paternity Test: वैवाहिक वादात मुलाच्या 'पितृत्व चाचणी'ला परवानगी: सर्वोच्च न्यायालय

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news