

Uttar Pradesh SIR Voter List: उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या आधी मतदार यादीत संशोधन करण्यासाठी SIR प्रक्रिया जोरदार पद्धतीनं राबवण्यात आली होती. त्यानंतर ड्राफ्ट मतदार यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. १७ नोव्हेंबर रोजी प्रसिद्ध झालेल्या या यादीतनुसार उत्तर प्रदेशात आता एकूण १३ कोटी ५८ लाख ९०५ मतदार नोंदणीकृत मतदार आहेत. एप्रिल २०२६ मध्ये प्रसिद्ध झालेल्या अंतिम मतदार यादीशी याची तुलना केली असता आकडेवारीत १८ लाख ८४ हजार ११३ मतदारांची वाढ झाली आहे.
मात्र असं असलं तरी राज्याच्या अंदाजे पात्र लोकसंख्या आणि मतदार यादीमधील नोंदणीकृत संख्येमध्ये अजून देखील २.५८ कोटींचे अंतर आहे. या १८ लाखाच्या वाढीत युवक मतदारांची संख्या घटली असून पुरूषांच्या तुलनेत महिला मतदारांची संख्या वाढली आहे.
मुख्य निवडणूक अधिकारी नवदीप रिणवा यांनी दिलेल्या माहितीनुसार यादीत ७ कोटी ३८ लाख ५८ हजार ५१० पुरूष तर ६ कोटी २० लाख ६ हजार ३५३ महिलांचा समावेश आहे. तसेच ४ हजार ०४२ तृतीयपंथी लोकांचा समावेश आहे. आता या यादीवर सामान्य लोकांकडून दावे, आक्षेप मागवण्यात आले आहेत. या ड्राफ्टमध्ये नाव नसणे, चुकीची माहिती नोंदवली जाणे, किंवा इतर त्रुटी असल्यास दिलेल्या कालावधीत नागरिक अर्ज करू शकतात.
ड्राफ्ट मतदार यादीत सर्वांचे लक्ष वेधून घेणारी गोष्ट म्हणजे या यादीत युवा मतदारांच्या संख्यात झालेली मोठी घट हा आहे. १८ ते १९ वर्षाच्या मतदारांच्या संख्येत वाढ होण्याऐवजी मोठी घट झाली आहे. १० एप्रिल २०२६ च्या अंतिम मतदार यादीत या वयोगटात १७ लाख ६८ हजार ३६० मतदार होते. नव्या ड्राफ्टमध्ये ही संख्या घटून ११ लाख ८३ हजार ३५२ इतकी झाली आहे. म्हणजे सात महिन्याच्या कालावधीत या वयोगटातील ५ लाख ८० हजार ८ मतदारांची घट झाली आहे.
ही घट २०२७ त्या विधानसभा निवडणुकीच्या आधी महत्वाची मानली जात आहे. कारण या निवडणुकीत पहिल्यांदा मतदान करणाऱ्या मतदारांची भूमिका महत्वाची असणार आहे. भारतीय निवडणूक आयोगाने SSR नुसार युवा आणि पहिल्यांदा मतदानासाठी पात्र मतदारांची मतदार यादीत नोंद करण्यासाठी विशेष जोर दिला होता. एक जानेवारी २०२७ ही पात्रतेची ठरवलेली तारीख मानून मतदारांना मतदान करण्याची संधी दिली जाणार आहे. ज्या युवकांचे या तारखेपर्यंत वय १८ वर्षे होईल ते नोंदणीसाठी अर्ज करू शकतात.