

नवी दिल्ली : अमेरिका वारंवार भारतीय लोकांसोबत, विद्यार्थ्यांसोबत क्रूरपणे वागत आहे. अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प यांनी अनेक वेळा युद्धबंदीचे श्रेय घेतले आहे. यावर आपल्या सरकारकडून मौन बाळगले जात आहे. अमेरिका भारताचा सन्मानाला ठेच पोहोचवत आहे, असे असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी, परराष्ट्र मंत्रालय काय करत आहेत, असा गंभीर प्रश्न काँग्रेसने विचारला.
राजधानी दिल्लीतील काँग्रेसच्या नव्या मुख्यालयात पक्षाच्या प्रवक्त्या सुप्रिया श्रीनेत यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी विविध मुद्यांवर भाष्य करत सरकारवर जोरदार टीका केली. श्रीनेत यांनी न्यूयॉर्क विमानतळावरील एक व्हिडिओ दाखवला. या व्हिडिओमध्ये एका भारतीय विद्यार्थ्याला अत्यंत वाईट पद्धतीने वागणूक दिली जात आहे आणि बेड्या घालून त्याला पाठवले जात आहे. यावरून त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींसह देशाच्या परराष्ट्र धोरणावरही टीका केली. केवळ व्हाट्सअपवर मोठ्या गोष्टी सांगून उपयोग नाही तर आंतरराष्ट्रीय पातळीवर आपल्या विद्यार्थ्यांचा पर्यायाने आपल्या देशाचा होणाऱ्या अपमानावर सरकारने उत्तर दिले पाहिजे, या गोष्टी होत असताना परराष्ट्र मंत्रालय काय करत आहे, जर सरकार उत्तर देणार नसेल तर सरकारचे या गोष्टीला समर्थन आहे का, पंतप्रधान का गप्प आहेत, पंतप्रधानांना कशाची भीती आहे, असे प्रश्नही त्यांनी विचारला. तसेच अमेरिकेने हे सगळे थांबवले पाहिजे असे आवाहनही त्यांनी केले.
श्रीनेत म्हणाल्या की, भारतीय विद्यार्थी गुंड नाहीत किंवा त्यांनी काही चुकीचे केले नाही. तरीही अमेरिका सातत्याने भारतीय वंशाच्या विद्यार्थ्यांना चुकीची वागणूक देत आहे. अनेक विद्यार्थ्यांचे व्हिजा पुढे जात नाहीत, त्यांचे ऍडमिशन रद्द केले जात आहेत, असेही त्या म्हणाल्या.
कुंभमेळ्यातील चेंगराचेंगरीत मृत्युमुखी पडलेल्या लोकांच्या संख्येसंदर्भात एक अहवाल प्रकाशित झाला. यावरूनही श्रीनेत यांनी सरकारवर हल्ला चढवला. या अहवालात ८२ जणांचा मृत्यू झाल्याचा दावा करण्यात आला आहे तर सरकारने केवळ ३७ जणांच्या मृत्यूची पुष्टी केली होती. मृतांच्या काही नातेवाईकांना पैसे देऊन त्यांचे नातेवाईक चेंगराचेंगरीत नव्हे तर दुसऱ्या कारणामुळे मरण पावले, हे सांगण्यात आल्याचेही अहवालात म्हटले आहे. सरकारने मृतांची आकडेवारी लपवल्याचा आरोपही श्रीनेत यांनी केला. तसेच त्या चेंगराचेंगरीनंतर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री बराच काळ गायब होते. सरकार आता या अहवालावर प्रतिक्रिया देईल का, असा प्रश्नही सुप्रिया श्रीनेत यांनी विचारला.