

US Defence Secretary on China-Taiwan Tension
ऑनलाईन डेस्क : सध्या चीनकडून इंडो-पॅसिफिक (Indo-Pacific) भागात वाढती आक्रमकता दाखवली जात आहे, आणि यावर अमेरिका अत्यंत गंभीर आहे. अमेरिकेचे संरक्षणमंत्री पीट हेगसेथ (Pete Hegseth) यांनी सिंगापूरमध्ये पार पडलेल्या शांघ्री-ला डायलॉग 2025 या आंतरराष्ट्रीय सुरक्षा संमेलनात चीनला थेट इशारा दिला.
आपल्या भाषणात त्यांनी सांगितले की, "चीनची सेना ही केवळ सराव करत नसून, तैवानवर प्रत्यक्ष नियंत्रण मिळवण्यासाठी युद्धसज्जतेचा सराव करत आहे." त्यांनी स्पष्ट केले की अमेरिका इंडो-पॅसिफिक क्षेत्रात आपली लष्करी उपस्थिती कायम ठेवेल आणि कम्युनिस्ट चीनच्या आक्रमक वर्तनाचा प्रतिकार करेल.
‘यूरेशियन टाइम्स’च्या अहवालानुसार, चीनने पुन्हा एकदा तैवानला चीनच्या मुख्य भूमीशी जोडण्याची प्रतिज्ञा केली आहे. बीजिंगने संकेत दिले आहेत की गरज पडल्यास ते बळाचा वापर करून तैवानवर नियंत्रण मिळवण्यासाठी सज्ज आहेत.
त्याच पार्श्वभूमीवर चीनने तैवानभोवती मोठ्या प्रमाणावर लष्करी कवायती (military drills) सुरू केल्या आहेत. अमेरिकन अधिकाऱ्यांनी याकडे संभाव्य "घेराबंदी" किंवा "थेट आक्रमण" म्हणून पाहिलं आहे.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा सत्ता स्वीकारल्यानंतर चीनविरोधी धोरण अधिक आक्रमक केलं आहे. त्यांनी चीनविरोधात व्यापार युद्ध (trade war) पुन्हा सुरू केलं असून, कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) क्षेत्रातील महत्त्वाच्या तंत्रज्ञानांवर चीनची प्रवेशमर्यादा घातली आहे.
यासोबतच फिलिपाइन्ससारख्या देशांबरोबर लष्करी संबंध बळकट करून, चीनविरोधात आघाडी उभी केली आहे.
शांघ्री-ला डायलॉगमध्ये बोलताना संरक्षणमंत्री हेगसेथ यांनी चीनवर सायबर हल्ल्यांचे, शेजारी देशांना त्रास देण्याचे आणि साउथ चायना समुद्रात बेकायदेशीर लष्करी बांधकामाचे आरोप लावले.
साऊथ चायना समुद्र हा जागतिक समुद्री व्यापाराचा सुमारे 60% भाग पार करणारा मार्ग असून, चीनच्या विस्तारवादी धोरणामुळे या भागातील तणाव वाढला आहे.
या महत्वपूर्ण संवाद परिषदेमध्ये चीनकडून कोणतेही वरिष्ठ अधिकारी उपस्थित नव्हते. त्यांच्या जागी पीपल्स लिबरेशन आर्मीच्या National Defence University मधील प्रतिनिधी पाठवण्यात आले.
अमेरिकेच्या अधिकाऱ्यांनी याबद्दल नाराजी व्यक्त करत स्पष्ट केलं की या चर्चेचा मुख्य विषय चीनच्या वाढत्या आक्रमकतेचा आणि तैवानवरील दबावाचा आढावा घेणं हाच होता.