

पुढारी ऑनलाईन डेस्क: अयोध्येतील राम मंदिरासाठी रामलल्लाची मूर्ती साकारणारे प्रसिद्ध शिल्पकार अरुण योगीराज यांना अमेरिकेने व्हिसा देण्यास नकार दिला आहे. यामागे अमेरिकेने कोणतेही ठोस कारण दिलेले नाही, असे वृत्त समोर आले आहे.
योगीराज यांना १२ व्या असोसिएशन ऑफ कन्नड कूटस ऑफ अमेरिका (AKKA) परिषदेत सहभाग घेण्यासाठी अमेरिकेला जायचं होतं. यासाठी त्यांनी अमेरिका सरकारकडे व्हिसाची मागणी केली होती. परंतु त्यांना यासाठी नकार देण्यात आला आहे.
जागतिक कन्नड परिषदेत (WKC 2024) सहभागी होणाऱ्या योगीराजांसाठी हा नकार मोठा धक्का आहे. असोसिएशन ऑफ कन्नड कूटस ऑफ अमेरिकाद्वारे (AKKA) आयोजित ही परिषद ३० ऑगस्ट ते १ सप्टेंबर या कालावधीत रिचमंड, व्हर्जिनिया येथील ग्रेटर रिचमंड कन्व्हेन्शन सेंटर येथे होणार आहे.
'रिपब्लिक टीव्ही'च्या वृत्तानुसार, अरुण योगीराज यांच्या कुटुंबीयांनी व्हिसा न मिळाल्याने निराशा व्यक्त केली आहे. कौटुंबिक व्यक्तीने दिलेल्या माहितीनुसार अरुण योगीराज यांची पत्नी विजेता या आधीच अमेरिकेला गेल्या होत्या. अशा परिस्थितीत अरुण यांना व्हिसा नाकारणे अगदीच अनपेक्षित आहे.
शिल्पकार अरुण योगीराज यांनी अमेरिकेची सर्व तयारी पूर्ण केली होती. तरीही अमेरिकेने व्हिसा नाकारल्याची पुष्टी त्यांनी केली आहे. यावेळी ते म्हणाले की, मला व्हिसा का नाकारला याचे कोणतेही कारण माहित नाही. परंतु आम्ही व्हिसाशी संबंधित सर्व कागदपत्रे जमा केली आहेत. AKKA जागतिक कन्नड कॉन्फरन्स वर्षातून दोनदा आयोजित केली जाते. या कार्यक्रमाचा उद्देश अमेरिकेसह जगाच्या इतर भागात राहणाऱ्या कन्नड समुदायातील सदस्यांना एकत्र आणणे हा आहे, असेही त्यांनी दिलेल्या माहितीत स्पष्ट केले आहे.