

पुढारी ऑनलाईन डेस्क: Parliament Budget Session 2025 | उत्तरप्रदेशातील प्रयागराज येथे महाकुंभ मेळा सुरू आहे. या दरम्यान चेंगराचेंगरी झाली होती यामध्ये अनेक भाविकांचा मृत्यू झाला होता. दरम्यान कुंभमेळ्यातील चेंगराचेंगरीचा मुद्दा विरोधी पक्षातील सदस्यांनी आज (दि.३) संसदेत उपस्थित केला, यावरून संसदेच्या लोकसभा सक्षागृहात प्रचंड गदारोळ निर्माण झाला.
संसदेत अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा आज (दि.३) दुसरा दिवस आहे. संसदेचे कामकाज सुरूवात होताच, सभागृहातील विरोधी पक्षातील सदस्यांनी महाकुंभमेळाव्यात झालेल्या चेंगराचेंगरीवर सभागृहात चर्चा करावी, मृतांची नावे सादर करावीत, अशी मागणी अध्यक्ष ओम बिर्ला यांच्यासमोर ठेवली. यावरून सभागृहात विरोधी पक्षातील सदस्यांनी जोरदार घोषणाबाजी करत गोंधळ घातला.
अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी १ फेब्रुवारी रोजी देशाचा केंद्रीय अर्थसंकल्प सादर केला. पण यावेळी विरोधकांनी महाकुंभातील चेंगराचेंगरीचा मुद्दा उपस्थित कत संसदेतही तो गाजवला. महाकुंभ चेंगराचेंगरीत मृत्युमुखी पडलेल्या लोकांची अचूक आकडेवारी जाहीर करण्याची मागणी समाजवादी समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव यांनी लोकसभेत यावेळी केली. यानंतर आज पुन्हा एकदा संसदेत याच मुद्द्यावरून गदारोळ झाला आहे.