

Upendra Dwivedi Operation Sindoor 2.0: भारतीय लष्कर प्रमुख उपेंद्र द्विवेदी यांनी शनिवारी (दि. ३० मे) भारत ऑपरेशन सिंदूर २.० ची तयारी करत आहे असं खळबळजनक विधान केलं. पहलगाम दहशवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानविरूद्ध केलेली कारवाई अजूनही सुरू आहे याचा देखील द्विवेदी यांनी पुनरूच्चार केला.
एएनआयशी बोलताना लष्कर प्रमुखांनी सांगितलं की, 'ऑपरेशन सिंदूर अजूनही सुरू आहे. सध्या फक्त आक्रमक कारवाईच्या ऐवजी तातपूरती शस्त्रसंधी लागू आहे.
जनरल द्विवेदी यांनी पाकिस्तानचे नाव न घेता इशारा देत भारताच्या लष्करी तयारी किती आहे हे अधोरेखित केलं. त्यांनी फक्त लष्करच नाही तर भारताचे वायू दल आणि नौदल देखील गरज पडल्यास नव्या ऑपरेशनसाठी सज्ज आहे असं सांगितलं.
लष्कर प्रमुख द्विवेदी म्हणाले, 'भारतीय लष्कर आणि सर्व तीन सुरक्षा दल ऑपरेशन सिंदूर २.० साठी तयारी करत आहे. सध्याच्या घडीला आम्ही आमच्यातील समन्वय वाढवत आहोत. तसेच पुढ्या युद्धासाठी सज्जता वाढवत आहोत. आम्ही सातही दिवस चोवीस तास काम करत आहोत.'
द्विवेदी पुढे म्हणाले, 'आता युद्धभूमी इतकी पारदर्शक झाली आहे की प्रत्येकाची प्रत्येक हालचाल ही दुसऱ्या देशाला कळते. त्यामुळं डिप्लॉयमेंट, एम्प्लॉयमेंट आणि सुरक्षेबाबत अत्यंत काळजी घ्यावी लागते. आमचे लष्कर आणि सीमा भागातील नागरिकांच्या संरक्षणासाठी ही काळजी घ्यावी लागते.
द्विवेदी यांनी माहिती युद्ध हे तेव्हाच यशस्वी होतं ज्यावेळी संपूर्ण देश एका नॅरेटिव्हच्यामागे एकत्र येतो. ते म्हणाले की, 'माहिती युद्ध हे त्याचवेळी यशस्वी होत ज्यावेळी संपूर्ण देश एकत्र येतो आणि जे लोक माहिती देत आहेत त्यांच्यावर विश्वास ठेवतात. जर ते घडलं तर एकी दाखवणारे नक्कीच युद्ध जिंकू शकतात.
गेल्या वर्षी भारताने ऑपरेशन सिंदूर लाँच केलं होतं. हा पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादाविरूद्ध लष्करी प्रत्युत्तर होते. हे ऑपरेशन ७ मे आणि ८ मे २०२५ च्या रात्री लाँच करण्यात आले होते. हे २२ एप्रिल रोजी पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याला प्रत्युत्तर होते. या दहशतवादी हल्ल्यात २६ निष्पाप लोकांना जीव गमवावा लागला होता.