

Union Minister Vaishnaw Uses Mappls App : केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी नुकताच आपल्या कारमध्ये 'मॅपमायइंडिया'चे स्वदेशी नेव्हिगेशन ॲप्लिकेशन 'मॅपल्स' (Mappls) वापरले. एका सोशल मीडिया पोस्टद्वारे मंत्र्यांनी या पूर्णपणे भारतीय मॅपिंग प्लॅटफॉर्मसोबतचा आपला अनुभव शेअर केला. तसेच ॲपच्या वैशिष्ट्यांवर प्रकाश टाकला. त्यांनी सर्व देशवासीयांनी हे ॲप वापरावे, असेही आवाहनही त्यांनी केले.जाणून घेऊया स्वदेशी मॅपल्स ॲपची वैशिष्ट्ये.
मंत्री अश्विनी वैष्णव यांनी ANI बरोबर बोलताना सांगितले की,"मी आज 'मॅपल्स' टीमला भेटलो. त्यांनी मला सांगितले की भारतातील सर्व OEM (Original Equipment Manufacturers), म्हणजेच कार उत्पादक कंपन्यांच्या गाड्यांमध्ये हे ॲप आधीपासूनच इन्स्टॉल केलेले आहे. मी ते स्वतः तपासले. हे ॲप कुठे ओव्हरब्रिज आणि अंडरपास आहेत, तेथे त्रिमितीय जंक्शन दृश्य (three-dimensional junction view) दाखवते."गाडी चालवत असताना त्यांना ॲपचे आणखी एक उपयुक्त वैशिष्ट्य आढळले. ते म्हणाले,"आपण बहुमजली इमारतीमधील एखाद्या विशिष्ट दुकानात जायचे असल्यास, 'मॅपल्स' ॲप त्या दुकानाबद्दलही नेमकी माहिती देते." जाणून घेवूया या स्वदेशी ॲपच्या वैशिष्ट्यांविषयी...
'मॅपमायइंडिया'ने (MapmyIndia) विकसित केलेले स्वदेशी नेव्हिगेशन ॲप 'मॅपल्स' (Mappls) गूगल मॅप्सप्रमाणेच कार्य करते. मात्र, याचा संपूर्ण डेटा भारतातच साठवला जातो, त्यामुळे गोपनीयता आणि सुरक्षिततेवर अधिक लक्ष दिले जाते, असे केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी नमूद केले आहे.
जंक्शन व्ह्यू (Junction View):हे ॲपचे एक खास वैशिष्ट्य. विशेषतः भारतीय रस्ते व क्लिष्ट चौकांसाठी डिझाइन केलेले हे फिचर ओव्हरब्रिज, अंडरपास किंवा मल्टी-लेन जंक्शनवरून जाताना रस्त्यांचा त्रिमितीय, फोटो-वास्तववादी (Photo-realistic) दृश्य दाखवते. यामुळे योग्य लेन निवडणे आणि वळण घेणे सोपे होते, आणि वाहन चालवणे अधिक सुरक्षित बनते.
मल्टी-फ्लोर नेव्हिगेशन (Multi-Floor Navigation):शॉपिंग मॉल्स, मोठे ऑफिस कॉम्प्लेक्स किंवा हॉस्पिटल्समध्ये हे ॲप थेट योग्य मजल्यापर्यंत पोहोचवते. तसेच लाईव्ह ट्रॅफिक सिग्नल टायमर (Live Traffic Signal Timers) सिग्नलवर गाडी उभी राहिल्यानंतर हिरवा दिवा किती सेकंदांत लागेल याचा रिअल-टाईम टायमर दाखवते. त्यामुळे गर्दीच्या शहरांतील ड्रायव्हिंग अधिक सोयीस्कर होण्यास मदत होते.
भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (NHAI) सोबतच्या भागीदारीमुळे हे ॲप टोल प्लाझा आणि त्यांच्या दरांची माहिती देते. वापरकर्त्यांना टोल-फ्री मार्ग निवडण्याचा पर्याय मिळतो, ज्यामुळे वेळ आणि पैशाची बचत होते.याशिवाय, हे ॲप खड्डे, स्पीड ब्रेकर, आणि ट्रॅफिक कॅमेरे यांचे रिअल-टाईम अलर्ट देऊन सुरक्षित ड्रायव्हिंगसाठी मदत करते.
मॅपल्स पिन (Mappls PIN) आणि डिजिटल ॲड्रेसिंग मॅपल्स पिन हा एक ६-अंकी (6-digit) कोड आहे, जो कोणत्याही ठिकाणाची ओळख म्हणून वापरता येतो. क्लिष्ट पत्ते सहज शेअर करता येतात. स्पष्ट पत्ते नसलेल्या भागांमध्ये डिजिटल ॲड्रेसिंग प्रणाली अत्यंत उपयुक्त ठरते.
मराठी, तमिळ, तेलुगू , हिंदी अशा भारतीय भाषांमध्ये नेव्हिगेशन मार्गदर्शन उपलब्ध आहे. हे इंग्रजी न येणाऱ्या वापरकर्त्यांसाठी उपयुक्त आहे. तसेच इस्रोच्या उपग्रहांद्वारे मिळणारी इमेजरी आणि पृथ्वी निरीक्षण डेटा ॲपमध्ये वापरला जातो.हे ॲप पूर्णपणे स्वदेशी असून, वापरकर्त्यांचा सर्व डेटा भारतातच सुरक्षित ठेवला जातो. त्यामुळे गोपनीयतेबाबत पूर्ण खात्री मिळते.इंटरनेट नसतानाही वापरता येणारे हे नकाशे ग्रामीण भागांत आणि कमी कनेक्टिव्हिटी असलेल्या ठिकाणी उपयुक्त ठरतात.