

पुढारी ऑनलाईन डेस्क : नवीन आर्थिक वर्ष सुरु होण्यापूर्वी केंद्र सरकारने केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांना खुशखबर दिली आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाने शुक्रवारी केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात (DA) २ टक्के वाढ करण्यास मंजुरी दिली. याबाबतचे वृत्त इकॉनॉमिक टाईम्सने सुत्रांच्या हवाल्याने दिले आहे. या निर्णयामुळे महागाई भत्ता ५३ टक्क्यांवरून ५५ टक्क्यांपर्यंत जाईल. यामुळे आठव्या वेतन आयोगापूर्वी कर्मचाऱ्यांच्या पगारात वाढ होईल. याआधी जुलै २०२४ मध्ये डीए ५० टक्क्यांवरून ५३ टक्क्यांपर्यंत वाढवण्यात आला होता.
केंद्रीय मंत्रिमंडळाने महागाई भत्त्यात वाढ केल्याने त्याचा फायदा ६८ लाखांहून अधिक कर्मचारी आणि सुमारे ४२ लाख पेन्शनधारकांना होईल. महागाई भत्ता (डीए) हा सरकारी कर्मचाऱ्यांना महागाईपासून दिलासा देणारा आणि त्यांचे वेतन राहणीमानाच्या वाढत्या खर्चाशी सुसंगत राहावे, यासाठी दिला जाणारा आर्थिक लाभ समजला जातो.
केंद्र सरकारकडून (Union Cabinet) दरवर्षी होळी आणि दिवाळी सणांपूर्वी दर दोन वर्षांनी महागाई भत्त्यात (DA hike) वाढीची घोषणा केली जाते. पण यावेळी होळीच्या सणाआधी याबाबत काही घोषणा करण्यात आली नव्हती. दरम्यान, महागाई भत्ता हा कर्मचाऱ्यांच्या शहरी, निमशहरी आणि ग्रामीण भागातील कार्यस्थळावर अवलंबून असतो. त्यामुळे प्रत्येकाच्या पदानुसार आणि कामाच्या ठिकाणानुसार तो कमी-जास्त असू शकतो.