

नवी दिल्ली : दिल्ली दंगल प्रकरणात उमर खालिदला अखेर अंतरिम जामीन मंजूर करण्यात आला. दिल्लीतील कडकडडूमा न्यायालयाने उमर खालिदला १६ डिसेंबर ते २९ डिसेंबर २०२५ पर्यंतचा अंतरिम जामीन गुरुवारी मंजूर केला. २७ डिसेंबर रोजी होणाऱ्या त्याच्या बहिणीच्या लग्नासाठी हा जामीन देण्यात आला.
अतिरिक्त सत्र न्यायाधीश समीर बाजपेयी यांनी जामीन मंजूर केला आणि म्हटले की, हे लग्न खालिदच्या बहिणीचे असल्याने, जामीन अर्ज स्वीकारण्यात येत आहे. न्यायालयाने उमर खालिदला २०,००० रुपयांचा वैयक्तिक जातमुचलका आणि त्याच रकमेच्या दोन जामीनदारांच्या अटीवर अंतरिम जामीन मंजूर करण्याचा आदेश दिला. जामीन कालावधीत न्यायालयाने खालिदवर अनेक अटी लादल्या आहेत. तो सोशल मीडिया वापरू शकणार नाही. त्याला फक्त कुटुंब, नातेवाईक आणि जवळच्या मित्रांना भेटण्याची परवानगी असेल. त्याला त्याच्या घरी किंवा लग्न समारंभाच्या ठिकाणी राहावे लागेल.
उमर खालिद २०२० पासून तुरुंगात
उमर खालिदला सप्टेंबर २०२० मध्ये अटक करण्यात आली होती आणि दिल्ली दंगलीदरम्यान बेकायदेशीर कारावाया (प्रतिबंध) कायद्याअंतर्गत (यूएपीए) गुन्हेगारी कट रचणे, दंगल भडकवणे, बेकायदेशीर सभेत भाग घेणे आणि इतर गंभीर गुन्ह्यांचा आरोप करण्यात आला होता. अटकेपासून तो सतत तुरुंगात आहे आणि त्याचे नियमित जामीन अर्ज अनेक वेळा फेटाळण्यात आले आहेत. अंतरिम जामिनामुळे, खालिद आता चार वर्षांहून अधिक काळानंतर पहिल्यांदाच मोठ्या कौटुंबिक कार्यक्रमात सहभागी होऊ शकेल. दरम्यान, उमर खालिदसह इतरांच्या जामीन अर्जांवर सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी निकाल राखून ठेवला आहे.