

Aadhaar verification system UIDAI : हॉटेलमध्ये चेक-इन करणे असो, रुग्णालयात दाखल होणे असो किंवा एखाद्या गिग वर्करच्या ओळखीची पडताळणी करणे असो आता यासाठी आधार कार्डची झेरॉक्स प्रत (फोटोकॉपी) देण्याची गरज हळूहळू संपणार आहे. भारतीय वशिष्ठ ओळख प्राधिकरणाने (UIDAI) आपली डिजिटल यंत्रणा अधिक सक्षम करत जानेवारीपासून तब्बल ३०० संस्थांना आपल्या ऑफलाइन व्हेरिफिकेशन सिस्टीममध्ये समाविष्ट केले आहे. त्यामुळे दैनंदिन सेवांमध्ये संमतीवर आधारित डिजिटल ओळख पडताळणीचा विस्तार मोठ्या प्रमाणावर वाढला आहे.
सध्या 'आधार ॲप'ला नागरिकांकडून मोठा प्रतिसाद मिळत असून या ॲपचे सुमारे ७.५ कोटी डाउनलोड्स झाले आहेत. इतकेच नव्हे तर, तब्बल ८६ लाखांहून अधिक नागरिक आधार केंद्रावर न जाता या ॲपच्या माध्यमातून आपला नोंदणीकृत मोबाईल नंबर अपडेट करत आहेत.
UIDAI कडून नोंदणीकृत करण्यात आलेल्या या ३०० संस्थांमध्ये हॉस्पिटॅलिटी, आरोग्य, शिक्षण, इव्हेंट्स, गिग वर्कर आणि ग्राहक सेवा क्षेत्रांतील संस्थांचा समावेश आहे. कागदी कागदपत्रे गोळा करण्याऐवजी डिजिटल पडताळणीचा वापर वाढवणे, हा या उपक्रमामागील मुख्य उद्देश आहे. यामुळे कागदपत्रांचे काम कमी होणार असून वैयक्तिक माहितीच्या गैरवापराचा धोकाही मोठ्या प्रमाणात टळणार आहे.
या नवीन व्यवस्थेनुसार, नागरिक स्वतःच्या संमतीने ॲपद्वारे आपल्या ओळखीचा तपशील संबंधित संस्थेसोबत सामायिक करू शकतात. यात आपली पूर्ण माहिती द्यायची की केवळ ठरावीक माहिती, याची निवड करण्याचा अधिकार नागरिकांना असेल. विशेष म्हणजे, या प्रक्रियेत नागरिकांचा १२ अंकी आधार क्रमांक पडताळणी करणाऱ्या संस्थेला पाठवला जात नाही. तसेच यासाठी संबंधित संस्थेला UIDAI च्या केंद्रीय डेटाबेसशी जोडण्याचीही आवश्यकता भासत नाही.
हॉटेल्स आणि इतर सेवा पुरवठादारांनी आधारच्या फोटोकॉपीऐवजी ॲप-आधारित डिजिटल ओळख पुरावा स्वीकारावा, यासाठी UIDAI कडून सातत्याने पुढाकार घेतला जात आहे. त्याचाच एक भाग म्हणून ही नवीन विस्तार योजना राबवली जात आहे. यापूर्वी गेल्या वर्षी एप्रिल महिन्यात UIDAI ने पहिल्या १०० संस्थांना या यंत्रणेशी जोडले होते.
पडताळणी प्रक्रियेसोबतच आधार ॲपचा वापर वैयक्तिक माहिती अपडेट करण्यासाठीही मोठ्या प्रमाणात केला जात आहे. UIDAI ने दिलेल्या माहितीनुसार, नागरिकांनी या ॲपद्वारे २२.१६ लाख पत्ते (अॅड्रेस) आणि ४०.२५ लाख ईमेल आयडी अपडेट केले आहेत.याशिवाय सुरक्षेशी संबंधित वैशिष्ट्यांनाही (फिचर्स) नागरिकांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. युजर्सना त्यांच्या बायोमेट्रिक (बोटांचे ठसे आणि डोळ्यांची बाहुली) वापरावर नियंत्रण ठेवता यावे यासाठी ॲपवर ४.६ कोटी बायोमेट्रिक लॉक आणि अनलॉक व्यवहार नोंदवले गेले आहेत. तसेच आणखी ३.६१ लाख आधार लॉक आणि अनलॉक व्यवहारही पार पडले आहेत.