पुढारी ऑनलाईन डेस्क: तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम के स्टॅलिन यांचा मुलगा उदयनिधी स्टॅलिन (Udhayanidhi Stalin) यांनी आज (दि.२९ सप्टेंबर) उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. राज्यपाल आरएन रवी यांनी उदयनिधी यांना चेन्नईतील राजभवनात पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. या शपथविधीला मुख्यमंत्री एम के स्टॅलिन यांच्यासह द्रविड मुन्नेत्र कळघम् पक्षाचे (DMK) अनेक नेते उपस्थित होते.
उदयनिधी स्टॅलिन (Udhayanidhi Stalin) यांनी उपमुख्यमंत्री पदी तर व्ही सेंथिलबालाजी, डॉ. गोवी चेझियान, आर. राजेंद्रन आणि एसएम नासर या नेत्यांनी मंत्रीपदाची आज चेन्नईतील राजभवनात शपथ घेतली. त्यांना तामिळनाडूचे राज्यपाल आरएन रवी यांनी पद आणि गोपनीयतेची शपथ दिली.
सीएम स्टॅलिन यांनी राज्यपाल आरएन रवी यांना उदयनिधी यांना उपमुख्यमंत्री म्हणून नामांकित करण्याची आणि मंत्रिमंडळाचा विस्तार करण्याची शिफारस केली होती. राज्यपालांनी त्यास मान्यता दिली. तामिळनाडू सरकारने शनिवारी (दि.२९) मंत्रिमंडळात फेरबदल केले. व्ही सेंथिल बालाजी यांना मंत्रिमंडळात स्थान दिले आहे. मनी लाँड्रिंग प्रकरणात बालाजीला २६ सप्टेंबर २०२४ रोजी सर्वोच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला होता. बालाजीने नोकरीच्या घोटाळ्यात अटक झाल्यानंतर फेब्रुवारी महिन्यात मंत्रीपदाचा राजीनामा दिला होता.
तामिळनाडूमध्ये वडील मुख्यमंत्री आणि मुलगा उपमुख्यमंत्री होण्याची ही दुसरी वेळ आहे. यापूर्वी २००९-११ या काळात एमके स्टॅलिन हे उपमुख्यमंत्री होते. तर त्यांचे वडील एम करुणानिधी मुख्यमंत्री होते.