

पुढारी ऑनलाईन डेस्क : काश्मीर खोर्यातील पहलगाम येथील हल्ल्यानंतर बारामुल्ला येथे दहशतवाद्यांनी घुसखोरीचा प्रयत्न केला. पण सुरक्षा दलांनी केलेल्या कारवाईत दहशतवाद्यांचा घुसखोरीचा प्रयत्न उधळून लावला. येथे सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांत चकमक सुरु असून त्यात दोन दहशतवाद्यांना ठार करण्यात आले आहे. या कारवाईदरम्यान सुरक्षा दलांनी सुरक्षा दलाने दहशतवाद्यांकडून मोठ्या प्रमाणात शस्त्रे, दारूगोळा आणि इतर युद्धसामग्री जप्त केली आहे. येथे कारवाई सुरु असल्याची माहिती भारतीय आर्मीच्या चिनार कॉर्प्सने दिली आहे.
काश्मीर खोर्यातील पहलगाम येथील बैसरन येथे (Pahalgam terrorist attack) मंगळवारी (दि.२२) लष्करी गणवेशात आलेल्या दोन दहशतवाद्यांनी पर्यटकांवर हल्ला केला. यात ३० पर्यटकांचा मृत्यू झाला. तर १५ हून अधिक जखमी झाले. मृतांमध्ये दोन परदेशी पर्यटकांचा समावेश आहे. विशेष म्हणजे दहशतवाद्यांनी पर्यटकांना धर्म विचारून अंदाधुंद गोळीबार करत स्वर्गभूमीवर रक्ताचा सडा सांडला. दरम्यान, सौदी अरेबिया दौर्यावर असलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी दौरा अर्धवट सोडून मायदेशी परतले. तत्पूर्वी त्यांनी गृहमंत्री अमित शहा यांना संपर्क करून परिस्थितीची माहिती घेतली. गृहमंत्री शहा हेही तातडीने काश्मीरला रवाना झाले असून आपत्कालीन बैठक बोलावण्यात आली आहे. या हल्ल्यावर देशभरातून तीव्र संताप व्यक्त होत आहे.
भारतीय लष्कराने मोठी कारवाई करत बुधवारी जम्मू आणि काश्मीरच्या बारामुल्ला जिल्ह्यात नियंत्रण रेषेवर (एलओसी) घुसखोरीचा प्रयत्न उधळून लावला. उरीजवळ ही कारवाई करण्यात आली. यात दोन दहशतवाद्यांना ठार करण्यात आले.
चिनार कॉर्प्सच्या माहितीनुसार, २३ एप्रिल रोजी उरी नाला येथील सरजीवन भागात २ ते ३ अज्ञात दहशतवाद्यांनी घुसखोरीचा प्रयत्न केला. पण सुरक्षा दलाने सतर्कता दाखवत मोठी कारवाई केली. यावेळी जोरदार गोळीबार झाला. या कारवाईत दोन दहशतवाद्यांना ठार मारल्याची पुष्टी झाली आहे.