

कुलगाम; वृत्तसंस्था : सणासुदीच्या पार्श्वभूमीवर दहशतवादी हल्ल्याचा कट उधळत सुरक्षा दलांनी दोन संशयित दहशतवादी हस्तकांना (ओव्हरग्राउंड वर्कर्स) जम्मू-काश्मीरमधील कुलगाम जिल्ह्यात रविवारी अटक केली असून, त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणावर चिनी बनावटीची शस्त्रास्त्रे आणि स्फोटके जप्त केली आहेत.
दिवाळीच्या दिवशी सुरक्षा दल आणि पोलिसांनी कुलगाममधील पानिवाह परिसरात संयुक्त नाकाबंदी केली होती. तपासणी सुरू असताना शेतातून कुलगाम शहराच्या दिशेने दोन संशयित व्यक्ती येताना दिसल्या. सुरक्षा पथकाला पाहताच या दोघांनी घटनास्थळावरून पळ काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, सीआरपीएफ आणि विशेष कृती गटाच्या सतर्क जवानांनी तत्परता दाखवत दोघांचाही पाठलाग करून त्यांना ताब्यात घेतले.
अटक करण्यात आलेल्या आरोपींची ओळख ताहिर बिलाल (रा. कुलगाम) आणि मुनीब यासीन राथर (रा. कुलगाम) अशी झाली आहे. अंगझडतीदरम्यान त्यांच्या ताब्यातून एक चिनी बनावटीचे पिस्तूल, मॅगझिन, ९ एमएमच्या २ जिवंत गोळ्या आणि २ चिनी हँडग्रेनेड जप्त करण्यात आले. कुलगाम पोलिस ठाण्यात या दोघांविरुद्ध संबंधित कायद्यांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून, हे हस्तक कोणत्या दहशतवादी संघटनेशी संबंधित होते, याचा सखोल तपास सुरू आहे.