

पुढारी ऑनलाईन डेस्क
जम्मू-काश्मीरमध्ये (Jammu and Kashmir) दोन वेगवेगळ्या चकमकीत दोन लष्करी जवान शहीद झाले आहेत. तर तीन दहशतवादी ठार झाले आहेत. किश्तवाड जिल्ह्यात शुक्रवारी दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीत दोन जवान शहीद झाले. यात एका अधिकाऱ्याचा समावेश आहे. तर दोन जण जखमी झाले.
बारामुल्ला येथे झालेल्या एका चकमकीत चक टपेर क्रीरी पट्टण भागातील एका इमारतीला घेरून सुरक्षा दलांनी तीन दहशतवाद्यांना ठार केले. येथे शुक्रवारी रात्री चकमक सुरु झाली असून अजूनही कारवाई सुरू आहे.
एका गुप्त माहितीच्या आधारे लष्कर आणि पोलिसांचा समावेश असलेल्या संयुक्त पथकाने नैदघम गाव परिसराची घेराबंदी करत शोधमोहीम सुरू केली. यादरम्यान किश्तवाडमध्ये गोळीबार सुरू झाला. येथे सैनिक अरविंद सिंग आणि कनिष्ठ आयुक्त अधिकारी नायब सुभेदार विपन कुमार गोळीबारात शहीद झाले. इतर दोन जखमी झाले आहेत. किश्तवाडला दक्षिण काश्मीरच्या अनंतनाग जिल्ह्याशी जोडणाऱ्या छतरू पट्ट्यातील नैदघम भागात पोलीस आणि लष्कर जवानांनी घेराबंदी आणि शोध मोहीम सुरू केली होती. यादरम्यान येथे चकमक उडाली.
व्हाईट नाईट कॉर्प्सने X वरील पोस्टमध्ये दोन जवान शहीद झाल्याची पुष्टी केली आहे. “जीओसी (जनरल ऑफिसर कमांडिंग) व्हाईट नाइट कॉर्प्स आणि सर्व रँकचा या शूरवीरांच्या सर्वोच्च बलिदानाला सलाम; आम्ही त्यांच्या कुटुंबियांप्रति मनापासून संवेदना व्यक्त करतो.” असे White Knight Corps ने म्हटले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी शनिवारी कडेकोट सुरक्षा व्यवस्थेत जम्मू आणि काश्मीरच्या डोडा जिल्ह्यात एका प्रचार सभेला संबोधित करणार आहेत. त्याआधी येथे काश्मीर खोऱ्यात चकमक झाली. गेल्या ४२ वर्षांतील पंतप्रधानांची डोडा येथील ही पहिलीच भेट असेल. डोडा शहरातील स्टेडियममध्ये आयोजित केलेली निवडणूक प्रचार सभा शांततापूर्ण आणि सुरळीत पार पडावी यासाठी डोडा आणि किश्तवाड या जिल्ह्यांमध्ये कडक सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे.