पुढारी ऑनलाईन डेस्क : आज त्सुनामी हा शब्द उच्चारला तरी निसर्गाचा प्रकोप, विध्वंस आणि क्षणात सारं काही उद्ध्वस्त असे चित्र आपल्या डोळ्यासमोर उभं राहतं. कारणही तसेच आहे. २६ डिसेंबर २००४ रोजी ९.१ रिश्टर स्केल भूकंपामुळे आलेल्या त्सुनामीचा तडाखा भारतासह तब्बल १४ देशांना बसला होता. ( Tsunami 2004 ) हा भूकंप आतापर्यंत नोंदलेला दुसरा सर्वात शक्तिशाली भूकंप ठरला. निसर्गाचा प्रकोपात सुमारे २ लाख ३० हजार लोक मृत्युमुखी पडले. त्यामुळे ही जगातील आतापर्यंतच्या दहा नैसर्गिक आपत्तीपैकी एक मानली जाते. एक क्षणात हजारो जीवांचे आयुष्य उद्ध्वस्त झालं होतं. या महाप्रलयानंतरच्या शारीरिक, मानसिक आणि आर्थिक संकटांनी लाखो जणांना सामोरे जावं लागलं.या महाप्रलयावेळी २६ वर्षीय नमिता राय यांनी अंदमान आणि निकोबार येथे आपल्या मुलाला जन्म दिला. त्याचे नाव त्सुनामी ठेवलं. एका डोळ्यात महाप्रलयामुळे आलेले अश्रू तर दुसर्या डोळ्यात मुलाला दिलेल्या जन्माचे आनंदाश्रू होतं. नियतीने घेतलेली ही सर्वात कठीण परीक्षा आठवताना आजही नमिता रॉय यांच्या काळजाचा थरकाप उडतो. जाणून घेवूया महाप्रलय आणि एक मुलाच्या जन्माची गोष्ट नमिता रॉय यांच्याच शब्दात...
महाप्रलयकारी त्सुनामीला २०वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त वृत्तसंस्था 'पीटीआय'ला दिलेल्या मुलाखतीत नमिता राय म्हणतात, २६ डिसेंबर २००४ रोजी त्या अंदमान आणि निकोबारमधील हट बे बेटावर राहत होत्या. तो काळा दिवस मला आठवायचा नाही. मी त्यावेळी गर्भवती होते. नेहमीप्रमाणचे आम्ही आमच्या कामात व्यस्त होतो. अचानक एक भयानक शांतता जाणवली आणि समुद्र आपल्या किनाऱ्यापासून काही मैल दूर सरकताना पाहून सर्वाच्या काळजाचे पाणी झालं. पक्षी विचित्र आवाज करू लागले. काही सेकंदांनंतर एक प्रचंड असा खडखडाट आवाज ऐकू आला आणि समुद्राच्या लाटांची एक मोठी भिंत हट बे बेटाकडे सरकत असल्याचे दिसलं. त्यानंतर जोरदार धक्के बसले. मी पाहिले की लोक ओरडत होते आणि एका टेकडीकडे पळत होते. याचवेळी मला पॅनिक अटॅक आला आणि मी बेशुद्ध पडले.
'काही तासांनंतर मला शुद्ध आली. मी समुद्राजवळच्या हजारो लोकांसमवेत डोंगरावर होते. माझा पती आणि मोठा मुलगा जवळ असल्याचे पाहून मोठा दिलासा मिळाला. आमच्या बेटाचा मोठा भाग त्सुनामीच्या लाटांनी गिळंकृत केला होता. जवळपास सगळी घरं उद्ध्वस्त झाली होती.
त्सुनामीच्या रात्री ११ वाजून ४९ मिनिटांनी मला प्रसूती वेदना होत होत्या. येथे डॉक्टर नव्हते. मी एका खडकावर झोपले होते. माझ्यासह माझा पती मदतीसाठी ओरडत होतो; परंतु कोणतीही वैद्यकीय मदत मिळू शकली नाही. काही महिलांना विनंती केली. त्या मदतीला धावल्या. त्यांच्या मदतीने मी खूप वेदना सहन करत मुलाला जन्म दिला.
मी बाळाला जन्म दिला तेव्हा आमच्याकडे अन्न नव्हते. तसेच समुद्राच्या भीतीने जंगलातून बाहेर येण्याचे धाडस होत नव्हते. जास्त रक्तस्त्राव झाल्याने माझी प्रकृती ढासळू लागली. माझी प्रसूती मुदतपूर्व (प्रीमॅच्युअर) झाली होती. आम्ही पुढील चार दिवस केवळ नारळ पाण्यावर जिंवत राहिलो. हट बे मधील लाल टिकरी हिल्स येथे चार रात्री घालवल्या. यानंतर मला संरक्षण कर्मचाऱ्यांनी पुढील उपचारासाठी पोर्ट ब्लेअरमधील जीबी पंत रुग्णालयात नेले.
नमिता रॉय यांचे पती लक्ष्मीनारायण कोरोना महामारीत निधन झाले. आता त्या सौरभ आणि त्सुनामी या दोन मुलांसह पश्चिम बंगालच्या हुगळी जिल्ह्यात राहतात. रॉय यांचा मोठा मुलगा सौरभ एका खाजगी शिपिंग कंपनीत काम करतो, तर त्सुनामी आता २० वर्षांचा झाला आहे.
'माझी आई माझ्यासाठी सर्वस्व आहे. मी माझ्या आयुष्यात तिच्यापेक्षा शक्तीशालाी स्त्री पाहिली नाही. माझ्या वडिलांच्या निधनानंतर आमच्या संगोपनासाठी तिने कठोर परिश्रम केले. तिने 'त्सुनामी किचन' नावची खाणावळ चालवली. आता भविष्यात मला समुद्र विज्ञान शास्त्रज्ञ होणार आहे, असा मानस त्सुनामी रॉय व्यक्त करतो.