

नवी दिल्ली : पुढारी वृत्तसेवा : देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जयंतीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी, लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला, काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, लोकसभेतील विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांनी समाज माध्यमांवरून अभिवादन केले. काँग्रेस सरचिटणीस प्रियंका गांधी यांनी पंडित जवाहरलाल नेहरूंच्या ‘शांतीवन’ या समाधीस्थळी जाऊन आदरांजली अर्पण केली. यावेळी त्यांच्यासह काँग्रेसचे संघटना सरचिटणीस के. सी. वेणुगोपाल, दिल्ली काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष देवेंद्र यादव उपस्थित होते.
लोकसभेतील विरोधी पक्ष नेते राहुल गांधी सोशल मीडियावर म्हणाले की, आधुनिक भारताचे जनक, विविध संस्थांचे निर्माते, भारताचे पहिले पंतप्रधान पं. जवाहरलाल नेहरू यांना त्यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन. लोकशाही, पुरोगामी, निर्भय, दूरदर्शी, सर्वसमावेशक - ही जवाहरलाल नेहरू यांची जीवनमूल्ये आपला आदर्श आणि भारताचा आधारस्तंभ आहेत आणि नेहमीच राहतील.
प्रियंका गांधी म्हणाल्या की, ‘देशाला २१ व्या शतकात आणण्यासाठी शेकडो शैक्षणिक, वैज्ञानिक, औद्योगिक, संशोधन संस्थांचे-प्रकल्पांचे दूरदर्शी, कृषी आणि उद्योग कार्यक्रमाच्या माध्यमातून आधुनिक भारताचा भक्कम पाया रोवणारे राष्ट्रनिर्माते आणि महान स्वातंत्र्यसैनिक पंडित जवाहरलाल नेहरू यांना ‘शांतीवन’ येथे आदरांजली अर्पण केली. पंडित नेहरूंचे लोकशाही आदर्श, स्वातंत्र्य, समता, न्याय आणि प्रगतीचे विचार आपल्या सर्वांसाठी प्रेरणादायी आहेत.