

नंदूरबार; पुढारी वृत्तसेवा : आमची लढाई विचारधारेशी आहे. पंतप्रधान मोदी महणतात मी खाली संविधान दाखवले. लाल रंगाचे संविधान दाखवले. परंतु, हे संविधान सर्व रंगाचे आहे. त्यामध्ये हजारो वर्षांचे विचार आहेत, बिरसा मुंडा, गौतम बुद्ध, डॉ. आंबेडकरांचे विचार आहेत, असे प्रतिपादन लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी आज (दि.१४) येथे केले. महाविकास आघाडीच्या उमेदवाराच्या प्रचारार्थ आयोजित सभेत ते बोलत होते.
ते पुढे म्हणाले की, संविधानाने तुम्हाला आदिवासी नाव दिले आहे. यात कुठेही तुम्हाला वनवासी असे लिहिलेले नाही. परंतु, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे लोक तुम्हाला वनवासी म्हणतात. परंतु तुम्ही आदिवासी आहात. आदिवासी म्हणजे देशाचा मूळ मालक आहे. जल, जमीन, जंगलाचे खरे मालक आदिवासी आहेत. नॅशनल मीडिया मध्ये 1 आदिवासी नाव सांगा, अदानी, अंबानीच्या कंपन्यामध्ये मोठ्या पदावर आदिवासी, दलित किती आहेत ? असा सवाल त्यांनी केला.
1 लाख कोटींची जमीन अदानीला दिली आहे. जेवढे कर्ज ते व्यापाऱ्यांचे माफ करणार, तेवढे आम्ही तुमचे करू. देशात आदिवासींची 8 टक्के लोकसंख्या आहे. भागीदारी पण 8 टक्के पाहिजे. देशातील GST चे 90 अधिकारी पैकी फक्त 1 अधिकारी आदिवासी आहेत. 100 रुपयांत 10 पैसेची हिसेदारी तुम्हाला मिळाली पाहिजे, असेही राहुल गांधी (Rahul Gandhi) म्हणाले.
युपीए सरकारने केलेल्या जमीन अधिग्रहण कायद्यामुळे जमीन, पाणी, जंगलाचे रक्षण झाले आहे. परंतु, भाजपकडून देशभरात जंगलतोड सुरू आहे. आदिवासी हा देशाचा पहिला मालक आहे. परंतु, त्यांच्या जमिनी बळकावल्या जात आहेत. तुमच्या जमिनी अरबपतींना दिल्या जात आहेत. भाजप सरकारने महाराष्ट्रात येणारे प्रोजेक्ट गुजरातला पाठवले. त्यामुळे महाराष्ट्रातील लोक दुसऱ्या राज्यात मजुरी करायला जातात. ५ लाख रोजगार महाराष्ट्रातून काढून घेतले आहेत. महाविकास आघाडीची सत्ता आल्यानंतर तुम्हाला महाराष्ट्रातच रोजगार मिळेल.