

Tragic News newborn baby Died during sleep: गजरौला पोलीस ठाण्यातील सिहाली जागीर गावातील एका दांपत्याला तब्बल ४ वर्षानं अपत्य झालं. २३ दिवस अत्यंत खेळीमेळीचे अन् आनंदाचे गेले. अनेक वर्षानं घरी पाळणा हलल्यामुळं सर्वचजण खूष होते. मात्र गेल्या रविवारची रात्र या २३ दिवसाच्या नवजात बाळासाठी काळरात्र बनून आली.
आई-वडील आपल्या नवजात बाळाला घेऊन झोपले होते. झोपेत थोडा निष्काळजीपणा झाला अन् या २३ दिवसाचं बाळाचे श्वासच थांबले. बाळाचा श्वास घुसमटल्यानं मृत्यू झाला. या ह्रदयद्रावक घटनेमुळं अख्ख्या गावावर शोककळा पसरली आहे.
पालकांना काहीच कळालं नाही
मिळालेल्या माहितीनुसार हे दांपत्य आपल्या नवजात बाळाला घेऊन एकाच बेडवर झोपलं होतं. झोपेत त्यांना मुलाचा जीव कधी गुदमरला आणि त्याचा श्वास थांबला हे कळालच नाही. ज्यावेळी या दांपत्याला मुलाची काहीच हालचाल होत नाही याची जाणीव झाली ते त्या बाळाला घेऊन धावत पळत गजरौलाच्या सार्वजनिक आरोग्य केंद्रात पोहचले.
दरम्यान आरोग्य केंद्रातील प्रभारी डॉक्टर योगेंद्र सिंह यांनी त्या मुलाची तपासणी केली. त्यानंतर त्यांनी हे मुल दगावल्याचं सांगितलं. मुल दगावल्याचं समजताच या दांपत्यामध्ये वादावादी सुरू झाली. त्यांनी एकमेकांवर आरोप करण्यास सुरूवात केली. डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार थंडीच्या दिवसात बेडमध्ये मुलं अशी गुदमरण्याची शक्यता जास्त असते. त्यामुळं नवजात बाळांच्या पालकांनी जास्त सतर्क राहिलं पाहिजे.
या दुःखद घटनेनंतर दांपत्यांमध्ये वादविवाद झाला. मात्र तरीही त्यांनी कोणत्याही कायदेशीर कारवाई करण्याचा निर्णय न घेता घरी जाणे पसंत केले. गावात ही बातमी वाऱ्यासराखी पसरली अन् या धक्कादायक घटनेची चर्चा सुरू झाली.