

फॅब्रिकेशन दुकानाच्या रस्त्यावर आलेल्या गेटला दुचाकीची धडक
पडलेल्या तरुणाला मागून येणार्या एसटीने चिरडले, जागीच मृत्यू
ग्रामस्थांचा संताप; दुकान मालकासह एसटी चालकावर गुन्हा दाखल
तणाव निवळल्यानंतर ग्रामस्थांकडून मृतावर अंत्यसंस्कार
सावंतवाडी : रस्त्याच्या बाजूने उघडलेल्या एका लोखंडी गेटला दुचाकी धडकली, यामुळे दुचाकीस्वार गाडीसह रस्त्यावर पडला. दुर्दैवाने याच वेळी त्याच्या मागून आलेली एसटी बस त्याच्यावरून गेल्याने त्याचा टायरखाली चिरडून जागीच मृत्यू झाला. रुपेश अनिल पाटकर (33, रा. माजगाव-कुंभारवाडा) असे या मृत युवकाचे नाव आहे.
मुंबई-गोवा जुन्या राष्ट्रीय महामार्गावर कोलगाव आयटीआय पासून 100 मीटर अंतरावर शुक्रवारी सायं. 5 वा. दरम्यान हा अपघात झाला. दरम्यान या अपघातास कारणीभूत ठरेलेल्या गेटसाठी फॅब्रिकेशन दुकानाच्या मालकावर गुन्हा दाखल करण्यात यावा, अन्यथा मृतदेह हलवू देणार नाही, अशी भूमिका ग्रामस्थांनी घेतली. पोलिसांनी तसे आश्वासन दिल्यानंतर मृतदेह रुग्णालयात हलविण्यात आला.
दुचाकीस्वार रुपेश पाटकर शुक्रवारी संध्याकाळी कुडाळ येथे निघाला होता. तो जुन्या मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील कोलगाव आयटीआय येथील जुना जकात नाका येथे आला असता रस्त्याच्या डाव्या बाजूस असलेल्या एका फॅब्रिकेशन वर्कशॉपचा लोखंडी गेट उघडा होता. रस्त्यावर आलेल्या या गेटचा अंदाज त्याला आला नाही. यामुळे त्याच्या दुचाकीची धडक थेट लोखंडी गेटला बसली, यात दुचाकी गेटमध्येच अडकल्याने रुपेश पाटकर हा रस्त्यावर फेकला गेला.यावेळी त्याच्या मागावून येत असलेल्या सावंतवाडी-कणकवली एसटी बसचे पुढील चाक त्याच्या अंगावर्रूीन गेल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. अपघातस्थळी मोठया प्रमाणावर नागरिकांची गर्दी झाली होती. पोलीस ठाण्यात कल्पना देताच घटनास्थळी पोलीस दाखल झाले, तोपर्यंत जुन्या महामार्गावरील दोन्ही बाजूंची वाहतूक खोळंबली होती.
पोलीसांनी पंचनामा करत मृतदेह जागेवरुन हलविण्यासाठी रुग्णवाहिका बोलविली, मात्र तिथे मृत रुपेश पाटकर याचे भाऊ सचिन पाटकर व माजगाव ग्रामस्थ दाखल झाले. हा अपघात या गेटमुळे झाला आहे, त्याला जबाबदार दुकान मालक असून त्यांच्याच हलगर्जीपणामुळे आमच्या युवकाचा जीव गेला आहे. त्यामुळे जोपर्यंत गेट मालकावर गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत मृतदेह हलवू देणार नाही, अशी आक्रमक भूमिका माजगाववासियांनी घेतली. पोलीस उपनिरीक्षक सरदार पाटील यांनी ग्रामस्थांची समजूत काढत संबंधीतांवर गुन्हे दाखल केले जातील असे सांगितले. मृतदेह त्यानंतर घटनास्थावरुन हलविण्यात आला.
पोलीस निरीक्षक अमोल चव्हाण यांनीही घटनास्थळी भेट देत पहाणी केली.ज्या गेटला दुचाकी धडकली होती तो गेट उघडून रस्त्याच्या मधोमध आल्याचे एसटी बसचालक व प्रवाशांनी पाहिले असल्याची माहिती माजगाव ग्रामस्थांनी पोलीसांना दिली.पोलीस ठाण्यात या अपघातानंतर माजगाव ग्रामस्थांनी पोलीस निरीक्षक अमोल चव्हाण यांची भेट घेतली. संबंधीत फॅब्रिकेशन वर्कशॉपच्या मालकावर गुन्हा दाखल झालाच पाहिजे अशी मागणी यावेळी केली. त्यावर श्री.चव्हाण यांनी रस्त्याची परिस्थिती व अपघात पाहता याला जबाबदार दुकान मालकावर पहिला तसेच एसटीबस चालकावर गुन्हे दाखल केले जातील असे आश्वासन दिले. माजगाव सरपंच रिचर्ड डिमेलो,क्लॅटस फर्नांडिस, राजू कुबल, जी.जी.कानसे, बाळा वेजरे, बाबू सावंत, मृत युवकाचे भाऊ सचिन पाटकर,राजन पाटकर आदी उपस्थित होते.
युवक रुपेश पाटकर याच्याकडे व्ही गार्ड इलेक्ट्रॉनिक कंपनीची एजन्सी होती. सिंधुदुर्ग जिल्हयातील एजन्सीचे काम तो सांभाळत होता. रुपेश याचे सहा महिन्यापूर्वीच लग्न झाले होते.त्याचे मुळ घर माजगांव येथे असून तो सध्या भाडयाने कुडाळ येथे राहत होता. काही महिन्यांपूर्वीच त्याच्या आईचेही निधन झाले होते.त्याच्या पश्चात दोन भाऊ,पत्नी असा परिवार आहे.घटनास्थळी सावंतवाडी आगार व्यवस्थापक नीलेश गावित यांनी भेट दिली. याबाबत पोलीस ठाण्यात सचिन पाटकर यांनी खबर दिली असून या अपघाताची नोंद करण्यात आली आहे.अपघातातील एसटी बस बाजूला केल्यानंतर दोन्ही बाजूंची वाहतूक सुरळीत करण्यात आली. रुपेश पाटकर याच्या अपघाती मृत्यूने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
कोलगाव येथे झालेल्या अपघात प्रकरणी अंबिका फेब्रीशेनचे मालक रमेश गजानन केनवडेकर आणि एसटी बस ड्रायव्हर कृणाल हनुमंत सातार्डेकर (रा. मोरगाव, ता. दोडामार्ग) यांच्या वर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.