नवी दिल्ली : पुढारी वृत्तसेवा
आम आदमी पक्षाने (रविवारी) तिहारच्या तुरूंग प्रशासनावर मोठा आरोप केला होता की, मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचे जेलमध्ये वजन कमी होत आहे. आपच्या नेत्यांनी आरोप केला होता की, मुख्यमंत्री केजरीवाल यांची तुरूंगात प्रकृती बिघडत आहे. यावर तिहारच्या तुरूंग प्रशासनाने आज उत्तर दिले आहे. यामध्ये त्यांनी म्हंटलंय की, केजरीवाल यांच्या प्रकृतीवर प्रशासनाकडून लक्ष ठेवले जात आहे. जीतके वजन कमी झाल्याचा दावा करण्यात येत आहे तितके ते कमी झालेले नाही असे म्हटले आहे.
दिल्ली तिहार तुरुंगाच्या अधीक्षकांनी आपल्या निवेदनात म्हटले आहे की, केजरीवाल 1 एप्रिल 2024 रोजी पहिल्यांदा तिहार तुरुंगात आले होते. तेव्हा त्याचे वजन 65 किलो होते. एक महिन्यानंतर, 10 मे रोजी त्यांचे वजन पुन्हा मोजण्यात आले, तेव्हा ते 64 किलो होते, म्हणजे ते फक्त 1 किलोने कमी झाले होते. त्यानंतर त्यांना सर्वोच्च न्यायालयाकडून अंतरिम जामीन मिळाला, त्यानंतर त्यांनी 2 जून रोजी आत्मसमर्पण केले. एका खासगी वाहिनीकडे त्याच्या वैद्यकीय अहवालाची प्रतही आहे.
तिहार तुरुंग अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, 2 जून रोजी आत्मसमर्पण केल्यानंतर केजरीवाल यांचे वजन 63.5 किलो होते. एका महिन्यानंतर 14 जुलै रोजी त्यांचे वजन 61.5 किलो होते. आम आदमी पार्टीचा दावा आहे की, तुरुंगात गेल्यानंतर सीएम केजरीवाल यांचे वजन 8.5 किलोने कमी झाले आहे, तर तिहार जेलने सांगितले की, त्यांचे आतापर्यंत केवळ 3.5 किलो वजन कमी झाले आहे. तुरुंग प्रशासनाने असेही सांगितले की, मुख्यमंत्र्यांचे वजन मोजले जाते तेव्हा त्यांच्या पत्नी सुनीता केजरीवालही हजर असतात.