

नवी दिल्ली | देशात पुढील काही दिवसांमध्ये हवामानात विविध बदल होणार असून, काही भागांमध्ये वादळी पावसाचा इशारा भारतीय हवामान खात्याने दिला आहे. ईशान्य आणि दक्षिण भारतातील अनेक राज्यांमध्ये विजेच्या कडकडाटासह पावसाची शक्यता असून, काही भागांत उष्णतेची लाटही जाणवणार आहे.
आसाम, मेघालय, अरुणाचल प्रदेशमध्ये २२ ते २४ एप्रिलदरम्यान अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे. २२ तारखेला आसाम आणि मेघालयमधील काही भागांत खूपच जोरदार पावसाचा इशारा आहे. पूर्व भारतात झारखंड, ओडिशा, पश्चिम बंगाल आणि छत्तीसगढमध्ये २० ते २४ एप्रिलदरम्यान वादळ, विजा आणि ताशी ३०-५० किमी वेगाने वाहणाऱ्या वाऱ्यांसह हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. ईशान्य भारतात पुढील पाच दिवसांत वाऱ्याचा वेग वाढून गडगडाटी वादळासह पाऊस होण्याची शक्यता देखील हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे.
कर्नाटकमधील अंतर्गत भाग, आंध्र प्रदेश, तेलंगणा, केरळ, तामिळनाडू, पुडुचेरी व लक्षद्वीपमध्ये देखील पुढील पाच दिवस वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता आहे. विशेषतः तामिळनाडूमध्ये विजा चमकण्याचा इशारा देण्यात आला आहे. रविवारी (दि. २०) केरळ, कोस्टल आंध्रप्रदेश आणि यानाम भागांतही मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
२० एप्रिल रोजी गुजरात राज्याच्या काही भागांत धुळीचे वारे वाहण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.
उत्तर-पश्चिम भारतात पुढील पाच दिवसांत तापमानात २-३ अंश सेल्सिअस वाढ होण्याची शक्यता आहे. मध्य भारत व गुजरातमध्ये फारसा बदल होणार नाही; मात्र काही भागांत २-३ अंश तापमान वाढण्याची शक्यता आहे. पूर्व भारतात तापमानात ४-६ अंश सेल्सिअस वाढ होण्याची शक्यता आहे. २१ ते २४ एप्रिलदरम्यान उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, राजस्थान आणि हरियाणामधील काही भागांत उष्णतेची लाट जाणवण्याची शक्यता आहे.