Jammu and Kashmir Accident
जम्मू-काश्मीरमधील उधमपूर जिल्ह्यात सीआरपीएफ जवानांना घेऊन जाणारे वाहन नाल्यात कोसळून भीषण अपघात झाला. या अपघातात तीन सीआरपीएफ जवानांचा मृत्यू झाला आहे. तर १५ जण जखमी झाले आहेत, असे वृत्त पीटीआय वृत्तसंस्थेने दिले आहे.
गुरुवारी सकाळी १०:३० वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. बसंत गड येथून एका ऑपरेशनवरून जवान परतत होते. या दरम्यान हा अपघात झाला. या वाहनात १८७ व्या बटालियनचे २३ जवान प्रवास करत होते.
केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांनी याबाबत माहिती देताना सांगितले की, ही घटना कांडवा-बसंतगड भागात घडली. घटनास्थळी बचावकार्य सुरू आहे. याबद्दल माझे नुकतेच डीसी सलोनी राय यांच्याशी बोलणे झाले.त्या स्वतः तेथील परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत. त्या मला अपडेट देत आहेत," असे त्यांनी X वर पोस्ट करत म्हटले आहे. या अपघातानंतर स्थानिकांनी जवानांना मदत केली, असेही ते म्हणाले.
उधमपूरचे अतिरिक्त पोलीस अधीक्षक संदीप भट यांनी दिलेल्या माहितीनुसार, जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल केले आहे.
जम्मू-काश्मीरचे नायब मनोज सिन्हा यांनी या घटनेबद्दल दुःख व्यक्त केले आहे. त्यांनी अधिकाऱ्यांना सर्वोतोपरी मदत करण्याचे निर्देश दिले आहेत. "उधमपूरजवळील अपघातात सीआरपीएफ जवानाचा मृत्यू झाल्याचे समजल्यानंतर दुःख झाले आहे. देशासाठी त्यांनी दिलेली सेवा आम्ही कधीही विसरणार नाही. शोकाकुल कुटुंबांसोबत माझ्या संवेदना आहेत. जखमी लवकर बरे व्हावेत, यासाठी मी प्रार्थना करतो," असे त्यांनी X वरील पोस्टमध्ये म्हटले आहे.