

नवी दिल्ली : तुझा नंबर मिळाला असल्यामुळे तुला शोधायला फार वेळ लागणार नाही, अमेरिकेतच तुला ठार मारले जाईल, अशा धमक्या कॉक्रोच जनता पार्टी या सोशल मीडिया पेजचे संस्थापक अभिजित दीपके यांना येऊ लागल्या आहेत. याविषयी त्यांनी स्वतः पोस्ट करून माहिती दिली आहे. यानंतर त्यांच्या समर्थकांनी तीव्र चिंता व्यक्त करून सायबर पोलिसांना याप्रकरणी त्वरित पावले उचलण्याचे आवाहन केले आहे.
आपल्याला देण्यात आलेल्या धमक्यांचे स्क्रीनशॉट दीपके यांनी अमेरिकेतून सोशल मीडियावर शेअर केले आहेत. यानंतर आता पोलिस यासंदर्भात कोणती पावले उचलणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
दीपके यांनी नीट पेपरफुटीप्रकरणी केंद्रीय शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. त्याबाबत त्यांनी एक व्हिडीओे ‘एक्स’वर पोस्ट केला आहे. यात त्यांनी म्हटले आहे, आता खरे काम करण्याची वेळ आली आहे. आज आम्ही शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी करणारी एक मोहीम हाती घेत आहोत. त्यावर सह्या कराव्यात. यामुळे व्यवस्थेतील त्रुटींवर प्रश्न उपस्थित करता येतील.
कॉक्रोच जनता पार्टीच्या अचानक वाढलेल्या लोकप्रियतेमुळे त्याचे संस्थापक अभिजित दीपके यांच्या आई-वडिलांना खूप चिंता वाटत आहे. आपला मुलगा अडचणीत येऊ शकतो आणि त्याला अटकही होऊ शकते, अशी भीती त्यांना वाटत आहे. अभिजितचे आई-वडील, भगवान आणि अनिता दीपके, महाराष्ट्रातील छत्रपती संभाजीनगर येथे राहतात. त्यांनी एका मराठी वृत्तवाहिनीला सांगितले की, त्यांच्या मुलाने राजकारणात यावे, अशी त्यांची इच्छा नव्हती. त्याच्या या निर्णयामुळे आमची झोप उडाली आहे.
सोशल मीडियावर सुरू झालेल्या ‘कॉक्रोच जनता पार्टी’ या मोहिमेला आता कायदेशीर आणि व्यावसायिक वळण लागले आहे. केंद्र सरकारच्या आदेशानंतर या मोहिमेचे मुख्य ‘एक्स’ खाते निलंबित करण्यात आल्यानंतर या नावाचा ट्रेडमार्क मिळवण्यासाठी स्पर्धा सुरू झाली आहे. यासाठी न्यायालयाचे दरवाजे ठोठावण्यात आले आहेत.
कॉक्रोच जनता पार्टीच्या इन्स्टाग्राम अकाऊंटने दोन कोटी फॉलोअर्सचा टप्पा ओलांडला असून, ही संख्या भारतीय जनता पक्ष आणि काँग्रेसच्या अधिकृत हँडलपेक्षाही जास्त आहे. या मोहिमेला अखिलेश यादव, महुआ मोईत्रा आणि कीर्ती आझाद यासारख्या प्रमुख नेत्यांनी पाठिंबा दिला आहे.
सोशल मीडियावर चर्चेत असलेल्या कॉक्रोच जनता पार्टीचे ‘एक्स’ अकाऊंट भारतात बंद करण्यात आल्यानंतर आता अभिजित दीपके यांनी ‘कॉक्रोच इज बॅक’ या नावाने नवे ‘एक्स’ खाते सुरू केले आहे. दीपके यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत यासंदर्भात माहिती दिली.
भारतात सध्या सर्वत्र चर्चेत असणार्या कॉक्रोच जनता पार्टीची प्रसिद्धी देशाच्या सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचली आहे. अभिजित दीपके यांच्यापासून प्रेरणा घेत तेथेही ‘कॉक्रोच आवामी लीग पार्टी’ जन्माला आली आहे.