

Shubhanshu Shukla talk with ISRO chief
पुढारी ऑनलाईन डेस्क : भारतीय अंतराळवीर शुभांशु शुक्ला सध्या आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानक (ISS) वर "Axiom-4" या खासगी अंतराळ मोहिमेचा भाग म्हणून कार्यरत आहेत. त्यांनी 6 जुलै रोजी ISRO प्रमुख व्ही. नारायणन यांच्याशी व्हिडीओ कॉलद्वारे संवाद साधला.
या संवादात त्यांनी स्वतःच्या प्रकृतीविषयी माहिती दिली आणि मोहिमेतील वैज्ञानिक प्रयोगांबाबत अद्ययावत माहितीही शेअर केली. दरम्यान, या संवादत शुभांशु यांनी आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात करायला सर्वात अवघड असलेली कोणती गोष्ट कोणती, याचीही माहिती दिली आहे.
या संवादादरम्यान डॉ. नारायणन यांनी शुभांशू यांची तब्येत, अंतराळात चालू असलेल्या विविध वैज्ञानिक प्रयोगांची माहिती विचारली आणि या मोहिमेतील कामगिरीबद्दल अभिनंदन केले. त्यांनी शुभांशू यांना त्यांच्या प्रयोगांची संपूर्ण माहिती नीटपणे नोंदवून ठेवण्याचे महत्त्व अधोरेखित केले, जेणेकरून भारताच्या आगामी मानवयुक्त अवकाश मोहिमेसाठी – 'गगनयान' प्रकल्पासाठी – उपयुक्त ठरू शकेल.
शुक्ला यांनी ISRO चे आभार मानले की, त्यांच्या सुरक्षित आणि यशस्वी प्रवासासाठी संस्थेने केलेली तयारी ही उल्लेखनीय होती.
डॉ. नारायणन यांनीही सांगितले की, त्यांनी मोहिमेपूर्वी शुभांशू शुक्ला यांच्याशी अनेकदा संवाद साधला होता. त्यांच्या वैज्ञानिक उद्दिष्टांवर मार्गदर्शन केले होते. तसेच, राखीव अंतराळवीर प्रशांत बालन नायर यांच्याशीही नियमित संपर्क ठेवून आवश्यक तयारी पूर्ण केली होती.
शुभांशू शुक्ला यांची ही मोहिम भारताच्या अंतराळ संशोधनाच्या इतिहासात एक मैलाचा दगड ठरणार असून, गगनयान यशस्वी करण्यासाठी अत्यंत उपयुक्त ठरेल, असा विश्वास ISRO ने व्यक्त केला आहे.
शुक्ला यांनी ISRO प्रमुखांना सांगितले की, त्यांनी आणि Axiom-4 च्या इतर सदस्यांनी एकूण 7 स्वदेशी प्रयोग आणि 5 वैज्ञानिक अभ्यास हाती घेतले आहेत. हे प्रयोग अंतराळातील मानवी आरोग्य, मायक्रोग्रॅव्हिटीतील जैविक प्रतिक्रिया आणि नवीन सामग्री तपासणी यांसारख्या बाबींवर केंद्रित आहेत.
या संवादावेळी ISRO चे अनेक वरिष्ठ अधिकारी देखील उपस्थित होते. त्यामध्ये विक्रम साराभाई अवकाश केंद्राचे (VSSC) संचालक आणि मानवी अवकाश कार्यक्रमाच्या प्रोग्राम मॅनेजमेंट कौन्सिलचे अध्यक्ष डॉ. उन्नीकृष्णन नायर, लिक्विड प्रपल्शन सिस्टीम्स सेंटरचे (LPSC) संचालक श्री. एम. मोहन, ISRO इनर्शियल सिस्टीम्स युनिटचे (IISU) संचालक पद्मकुमार ई. एस., ISRO चे वैज्ञानिक सचिव एम. गणेश पिल्लई आणि माजी संचालक श्री. एन. वेदाचलम यांचा समावेश होता. या अधिकाऱ्यांनी देखील शुभांशू शुक्ला यांच्याशी संवाद साधून प्रयोगांविषयी चर्चा केली.
दरम्यान, 4 जुलै रोजी विद्यार्थ्यांसोबत झालेल्या संवादात शुक्ला यांनी सांगितले की, “अंतराळ स्थानकात झोपणे हे सर्वात कठीण काम आहे. कारण तुम्हाला नेहमी असे वाटत राहते की, इथे तुम्ही खूप कमी वेळासाठी आहात आणि त्याकाळात जास्तीत जास्त काम केले पाहिजे.”
तरीही त्यांनी विश्रांती घेण्याचे महत्त्व अधोरेखित केले कारण प्रयोगांसाठी ऊर्जा आणि ताजेपणा आवश्यक आहे, असे सांगितले. शुक्ला यांनी रॉकेट लाँचच्या क्षणाचे वर्णन “उत्साहवर्धक” असे केले. “जसे आपण वर जातो तसे गती वाढत जाते. गतीकरण खूपच तीव्र होते,” असे ते म्हणाले.